१० तारखेपर्यंत मिळणार 'गृह आधार', 'दयानंद सुरक्षा'चे पैसे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 09:42 IST2026-03-11T09:41:29+5:302026-03-11T09:42:58+5:30
गृहिणी निराधार ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांगांना दिलासा

१० तारखेपर्यंत मिळणार 'गृह आधार', 'दयानंद सुरक्षा'चे पैसे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गृहिणींसाठीच्या 'गृह आधार' आणि निराधार ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग तसेच एचआयव्ही बाधितांसाठी असलेल्या दयानंद सामाजिक सुरक्षा या दोन्ही योजनांअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत यापुढे दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
मुख्यमंत्र्यांनी पर्वरी येथे विधानसभा संकुलाच्या आवारात झालेल्या खास कार्यक्रमावेळी ही माहिती दिली. कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री विश्वजीत राणे आणि समाजकल्याण मंत्री सुभाष व फळदेसाई यांसह अधिकारी उपस्थित होते. मंगळवारी राज्यातील २.२४ लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात थेट ४५.२६ कोटी रुपये जमा करण्यात आले. यामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांचाही समावेश आहे. मासिक मानधनामधील विलंब टळून पारदर्शकता निर्माण होईल अशी यंत्रणा राबवण्यात येणार आहे.
अंत्योदय ध्येयाला बळकटी
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'या योजनांमुळे कुटुंबे, महिला, ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि इतर दुर्बल घटकांना सामाजिक सुरक्षा मिळत असून सरकारच्या अंत्योदय ध्येयाला बळकटी मिळत आहे. या योजनांचे मानधन लाभार्थ्यांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे त्यांना त्रास होतो, अशा तक्रारी विविध आमदारांनी विधानसभेतही केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन दर महिन्याला किमान १० तारीखपर्यंत लाभार्थ्यांचे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावे, अशी व्यवस्था केली आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशही दिले आहेत.