गोविंद-तवडकर वाद मिटलाय; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:42 IST2025-09-24T12:41:32+5:302025-09-24T12:42:16+5:30

प्रेम आहे तिथे रुसवे फुगवे असतात

govind gaude and ramesh tawadkar dispute resolved goa bjp state president damu naik claims | गोविंद-तवडकर वाद मिटलाय; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा दावा 

गोविंद-तवडकर वाद मिटलाय; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा दावा 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'आमदार गोविंद गावडे व मंत्री रमेश तवडकर यांच्यामधील वाद आता मिटला आहे' असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला आहे. त्या दोघांशी आपण बोललो असल्याचे ते म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दामू नाईक म्हणाले की, 'काही वेळा पोरकटपणा होतो. वाद वाढवून नाव बदनाम करण्याचे प्रयत्नही केले जातात. जबाबदारीने विधाने करा, असे मी आमदारांना सांगितले आहे.'

'तो' व्हिडीओ माझी बदनामी करणारा : दामू नाईक

दरम्यान, दामू नाईक यांनी आपल्याबद्दल व्हायरल झालेल्या एका व्हिडीओबद्दल बोलताना सांगितले की, 'मी गुंडांना संरक्षण देतो, अशी चुकीची माहिती देणारा व्हिडीओ अज्ञाताने व्हायरल केला आहे. गुंडांशी संबंधित सुरेश नाईक हा माझा नातेवाईक असल्याचेही त्यात म्हटले आहे. सुरेश याच्याशी माझे कोणतेही संबंध नसून तो कुठून माझा नातेवाईक होतो, हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनी सांगावे. 'दामू म्हणाले की, 'माझ्या वाढदिवसाला अनेकजण आले होते. अनेकांनी मला केक भरवला. त्यात कोण कोण होते, हेही मला ठाऊक नाही. अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी जर उत्तर दिले नाही, तर लोकांना वाटेल की काहीतरी काळेबेरे आहे. त्यामुळे हा खुलासा करावा लागत आहे. रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी अटकेतील गुन्हेगार जेनिटो याच्यासोबत सुरेश नाईक याचा फोटो असल्याचे व्हायरल करून आपले नाव सुरेश नाईक यांच्याशी जोडले झाले जात आहे, हे चुकीचे आहे.'

सावलीलाही राहण्याची इच्छा नाही : तवडकर

मंत्री रमेश तवडकर यांनी 'माझ्या दृष्टीने हा विषय बंद झाला आहे', असा पुनरुच्चार करीत 'ज्याच्याशी माझे पटत नाही, त्याच्या सावलीलाही राहण्याची माझी इच्छा नाही', असे म्हटले आहे. तवडकर म्हणाले की, 'मी हा विषय कधीच संपवला आहे. माझ्याकडे आणखी वेगळे विषय इतर महत्त्वाची कामेही आहेत. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशीही मी काम करतो. गावडे यांनी काहीबाही बोलून डिवचण्याचा प्रयत्न केला किंवा पत्रकारांनी खोदून खोदून विचारले तरी मी यापुढे या विषयावर बोलणार नाही. ज्या व्यक्तीशी पटत नाही, त्याच्या सावलीलाही मी राहत नाही. गोव्यातील जनता मला पूर्णपणे ओळखते. त्यामुळे कोणी कितीही आरोप किंवा टीका केली, तरी त्याला मी उत्तर देण्याची गरज नाही. माझ्या हितचिंतकांनीही मला फोन करून कोणी जर अशी टीका करीत असेल, तर दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे यापुढे मी या विषयावर मुळीच बोलणार नाही. यापूर्वी गोविंदसोबतच्या सहवासात खाणे, पिणे झाले किंवा इतर गोष्टी झाल्या त्या मी पूर्णपणे विसरलो आहे.'

मी पुस्तक बंद करणारा नव्हे : गावडे

आमदार गोविंद गावडे यांनी 'मी पुस्तक बंद करणारा माणूस नव्हे.', असे विधान केले. ते म्हणाले की, तवडकर यांनी आपल्या अंगावर चिखल उसळवून घेतला आहे. 'देवचार', 'शेणाचा थापा', 'काजुलों' अशा उपमा त्यांनी मला दिल्या. त्याकडे मी सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहतो. देवचार माणसांना लपवतो, तशी वाटही दाखवितो. देवचार हा राखणदार आहे. काजुलों काळोख्या रात्री लखलखतो. काजुल्याने मला काळी मनें, काळी प्रवृत्ती शोधून काढण्यास नेहमीच साथ दिली. शेण हे पवित्र मानले जाते. निंदकाचे घर असावे शेजारी, या उक्तीप्रमाणे कोणी निंदक जर टीका करत असतील, तर त्याला उत्तर द्यावेच लागेल.

 

Web Title: govind gaude and ramesh tawadkar dispute resolved goa bjp state president damu naik claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.