गोमंतक बहुजन महासंघ: आमदार गोविंद गावडे अध्यक्षपदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 07:43 IST2025-07-21T07:42:02+5:302025-07-21T07:43:02+5:30
भालचंद्र उसगांवकर यांची महासचिव, तर राजेश नाईक यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.

गोमंतक बहुजन महासंघ: आमदार गोविंद गावडे अध्यक्षपदी
लोकमत न्यूज नेटवर्क, माशेल : गोमंतक बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी आमदार गोविंद गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवडणूक पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात पार पडली. भालचंद्र उसगांवकर यांची महासचिव, तर राजेश नाईक यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. उदय कुडाळकर यांनी काम पाहिले. या समितीची वर्ष २०२५-२६ ते २०२७-२८ या कार्यकाळासाठी निवड करण्यात आली आहे. या समितीत आणखी ३६ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. महासचिव भालचंद्र उसगावकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. आमदार गावडे यांनी सभेत उपस्थितांचे स्वागत केले.
समाजाचे आभार
"माझ्यावर विश्वास ठेवून गोमंतक बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी निविंवाद एकमताने निवड केल्यानंतर महासंघाचा आभारी आहे. 'बहुजन हिताय - बहुजन सुखाय' या ब्रीदानुसार माझ्या सर्व बहुजन समाजाला घेऊन पुढे वाटचाल करणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांतच महासंघाच्या नवीन समितीची बैठक घेऊन पुढील कार्याची रूपरेषा ठरवण्यात येईल," असे आमदार गावडे यांनी निवडीनंतर सांगितले.