मटका प्रकरणात गोव्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना अटकपूर्व जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 17:02 IST2017-10-06T17:01:53+5:302017-10-06T17:02:01+5:30

मटका प्रकरणात गोव्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना अटकपूर्व जामीन मंजूर
मडगाव (गोवा): कथित मटका प्रकरणात चौकशी सुरू झाल्याने अडचणीत आलेले गोव्याचे विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांना दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने आज शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे दिलासा मिळाला. त्यांचे बंधू बाबल कवळेकर यांनाही न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना जर पोलिसांना चौकशीसाठी कवळेकरांची गरज असल्यास त्यांनी चौकशीसाठी हजर रहावे अशी अट त्यांना घातली आहे.
दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश भरत देशपांडे यांनी शुक्रवारी दुपारी दिलेल्या आदेशात बाबू कवळेकर यांना अटक केल्यास ५0 हजार रुपयांच्या तर बाबल कवळेकर यांना अटक केल्यास २0 हजार रुपयांच्या जामीनावर मुक्त करावे असे आपल्या आदेशात म्हटले. हा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात लोकांनी गर्दी केली होती.
विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली एफआयआर नोंद झाली असून, यासंदर्भात त्यांच्या घरावर छापा टाकला असता मोठ्या प्रमाणावर मटक्याच्या चिठ्ठ्या सापडल्याचा दावा या प्रकरणात तपास करणा-या क्राईम ब्रँचने केला होता. यासंदर्भात दोन्ही कवळेकर बंधूंना चौकशीसाठीही बोलावले होते. मात्र अटकपूर्व जामिनाचा अर्ज सुनावणीस आला असता क्राईम ब्रँचने अत्यंत हलगर्जीपणाने हे प्रकरण हाताळल्याचे उघड झाले होते. सदर प्रकरणात कवळेकर यांचा हात असल्याचा कुठलाही पुरावा न्यायालयासमोर येऊ न शकल्यामुळे त्या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर झाला.