म्हादईच्या प्रश्नावर गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांची घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 15:27 IST2019-11-01T13:03:03+5:302019-11-01T15:27:38+5:30
म्हादईच्या प्रश्नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळ येत्या ४ रोजी दिल्लीला नेण्याचे ठरले असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेतृत्त्व करणार आहेत.

म्हादईच्या प्रश्नावर गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांची घेणार भेट
पणजी : म्हादईच्या प्रश्नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळ येत्या ४ रोजी दिल्लीला नेण्याचे ठरले असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेतृत्त्व करणार आहेत. दिल्लीत केद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावेडकर यांची भेट घेऊन कळसा भंडुरा प्रकल्पाला पर्यावरणीय परवाना मागे घेण्याची मागणी केली जाईल.
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, जलस्रोतमंत्री फिलिप नेरी रॉड्रिक्स, काँग्रेस, मगो, गोवा फॉरवर्डचे प्रतिनिधी यांचा यात समावेश असेल. याशिवाय अॅडवोकेट जनरल देविदास पांगम, जलस्रोत मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी, म्हादई बचाव अभियानच्या निर्मला सावंत, राजेंद्र केरकर यांचा शिष्टमंडळात समावेश असेल. गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई व मगोपचे सर्वेसर्वा आमदार सुदिन ढवळीकर यांनी आपण या शिष्टमंडळात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
सरदेसाई म्हणाले की, ‘तसे पाहिल्यास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना भेटण्यात काहीच अर्थ नाही कारण त्यांनीच कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पाला ईसी दिलेली आहे. तरीही सरकारला असहकार्य करीत असल्याचा आळ येऊ नये म्हणून या शिष्टमंडळात मी सहभागी होणार आणि ईसी दिल्याबद्दल निषेध करुन ती मागे घेण्याची मागणी करणार आहे. मगोपचे सर्वेसर्वा आमदार सुदिन ढवळीकर यांनीही आपण सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होणार असल्याचे सांगितले