'झेडपी' : कुणाचे पारडे जड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:35 IST2025-12-17T11:35:34+5:302025-12-17T11:35:34+5:30

गोव्यातील दोन जिल्हा पंचायतींच्या ५० मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे.

goa zp election 2025 whose face is heavier | 'झेडपी' : कुणाचे पारडे जड?

'झेडपी' : कुणाचे पारडे जड?

'झेडपी' निवडणुकीचा जाहीर प्रचार आता लवकरच संपुष्टात येईल. गोव्यातील दोन जिल्हा पंचायतींच्या ५० मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. शनिवारी मतदान होईल. यावेळच्या 'झेडपी' निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. कारण वर्षभरानंतर लगेच विधानसभा निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी त्यामुळे आपली शक्ती आताच पणाला लावली. कोण किती पाण्यात आहे, हे तपासून पाहण्याची ही संधी आहे. विधानसभेची सेमी फायनल भाजपने गंभीरपणे घेतली. विरोधी पक्षांनीही गंभीरपणेच रिंगणात उडी टाकली; पण विरोधकांची युती होऊ शकली नाही. उलट 'आरजी' सारखा दमदार पक्ष विरोधकांच्या युतीतून बाहेर गेला. आम आदमी पक्षाने अगोदरच वेगळी वाट धरली. गोव्यात आप पक्षाला काँग्रेसची जागा घ्यायची आहे. आपणच भाजपचा पराभव करू शकतो किंवा आपणच विरोधकांमधील जास्त गंभीर व बलवान पक्ष आहोत, असे दाखविण्याचा आपचा प्रयत्न राहिला आहे. 

दिल्लीचे दोन माजी मुख्यमंत्री आप पक्षाने गोव्यात प्रचारासाठी आणले. अरविंद केजरीवाल व आतिशी या दोघांनीही सभा गाजवल्या; मात्र त्यांचा जास्त भर हा सासष्टी तालुका व आसपासच्या भागात राहिला. जिथे त्यांचे दोन आमदार आहेत, तिथे लोकांची गर्दी उभी करून केजरीवाल यांच्या सभा घेतल्या गेल्या. केजरीवाल यांनी गोव्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्याची संधी साधलीच. हे हप्ता वसुली सरकार आहे, त्यामुळेच नाइट क्लबमध्ये अग्निकांड घडले, अशी टीका केजरीवाल यांनी सुरूच ठेवली. पूर्वी असे आरोप झाले की, भाजप लगेच दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आरोपांना उत्तर देत असे; पण आता तसे घडत नाही. आरोपही नेहमीचे झाले आहेत. सरकारमध्ये काय चाललेय ते लोकांनाही ठाऊक असल्याने भाजपही स्पष्टीकरण देण्याच्या जास्त फंदात पडत नाही, हे जाणवते.

गेले अनेक दिवस भाजपच्या सर्व आमदार, मंत्र्यांनी घाम गाळला आहे. प्रचार जोरात केला. आम्हीच गोमंतकीयांची घरे कायदेशीर करून देणार आहोत, असे मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यभर फिरून सांगितले. मी रात्री अकरा वाजता विधेयक विधानसभेत सादर केले, कारण लोकांची घरे मला कायदेशीर करायची आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. चिंबल इंदिरानगर झोपडपट्टीतील लोकांसमोरही मुख्यमंत्र्यांची सभा झाली. शिवोली, पेडणे, मांद्रे, मये, डिचोली अशा मतदारसंघांतही सभा झाल्या. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. घरे कायदेशीर करण्याचा कायदा मी आणला म्हणून विरोधकांच्या पोटात दुखले, असा दावा मुख्यमंत्र्यांनी सातत्याने केला आहे. मी प्रसंगी विरोधी आमदारांच्या शिव्यादेखील ऐकल्या, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला. ही भाजपची खास स्टाइल आहे, काहीवेळा ही स्टाइल लोकांना आवडतेदेखील. अर्थात काहीवेळा हीच स्टाइल आपचे नेते केजरीवालदेखील उचलतात, हे वेगळे सांगायला नको.

मुख्यमंत्र्यांप्रमाणेच मंत्री विश्वजित राणे, रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही प्रचारासाठी बरेच कष्ट घेतले आहेत. काहीजणांना भाजपमध्ये प्रवेश दिला गेला, तर दहा असंतुष्टांना भाजपने पक्षातून काढून टाकले. प्रथमच 'झेडपी' निवडणुकीवेळी असा अनुभव आला की, भाजपमधील अनेकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरले. एकदम दहाजणांना पक्षातून बाहेर काढावे लागले, अर्थात काहीजण स्वतःहूनच बाहेर गेले होते. माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी मात्र भाजपला तोरसेत आव्हान दिले असून, त्यांच्या विरोधात पक्ष कारवाई करू शकला नाही. मला चमचा बनून राहणे मान्य नाही, असे बाबूंनी थेट सांगून टाकले आहे.

विरोधकांपैकी विजय सरदेसाई, अमित पाटकर, युरी आलेमाव यांनी विरोधी उमेदवारांचे प्रचारकार्य चालवले आहे. काँग्रेस व फॉरवर्ड यांच्यात युती आहे, याचा लाभ 'झेडपी' निवडणुकीवेळी कुणाला झाला हे निकालावेळी कळून येईलच. 'झेडपी'चे प्रचार काम सुरू झाले तेव्हाच हडफडे येथे नाइट क्लबचे अग्निकांड घडले. पंचवीस जणांचा जीव गेला. यामुळे सरकारला नकारात्मक स्थिती निर्माण झाली होती. गोव्यात नाइट क्लबवर नियंत्रण यायला हवे, असे अनेकांना वाटते. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपली भावना परवा व्यक्त केली. समजा उत्तर व दक्षिण गोव्यात जास्त जागा भाजप जिंकला तर, काही मंत्री अधिक बलवान बनतील; मात्र दक्षिण गोव्यात भाजपसाठी आव्हानात्मक स्थिती आहे.
 

 

Web Title : गोवा जिला पंचायत चुनाव: किसका पलड़ा भारी?

Web Summary : गोवा में जिला पंचायत चुनाव राज्य चुनावों से पहले महत्वपूर्ण हैं। भाजपा कड़ी मेहनत कर रही है, मंत्री தீவிர प्रचार कर रहे हैं। विपक्ष की एकता टूटी, आप का लक्ष्य कांग्रेस को बदलना है। नाइट क्लब की आग से दबाव बढ़ा। दक्षिण गोवा भाजपा के लिए चुनौती है।

Web Title : Goa Zilla Panchayat Elections: Whose influence is stronger in the fray?

Web Summary : Goa's Zilla Panchayat elections are crucial before state polls. BJP is pushing hard, ministers campaigning intensely. Opposition unity fractured, AAP aims to replace Congress. Nightclub fire adds pressure. South Goa poses challenge for BJP.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.