स्वयंपूर्ण गोव्यासाठीच प्रयत्नशील: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:46 IST2025-12-18T11:44:55+5:302025-12-18T11:46:05+5:30
बोरी येथे भाजपची प्रचारसभा, मंत्री शिरोडकर, आमदार साळकर यांची उपस्थिती

स्वयंपूर्ण गोव्यासाठीच प्रयत्नशील: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यातील भाजपचे सरकार चौफेर विकास करत आहे. स्वयंपूर्ण गोवा योजनेंतर्गत राज्यातील पडीक जमिनी लागवडीखाली आणून स्ट्रॉबेरी सारख्या उत्पादनाबरोबरच डेरी फार्मची ही संकल्पना राबविली जाणार आहे.
स्वयंसाहाय्य गटातील महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने सर्व कामे मार्गी लागत आहे. सुमारे ३१० स्वयंसेवक महिलांना गेल्या दहा वर्षात ३४० कोटी रुपयांची साहाय्य देण्यात आले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोरी येथे केले. बोरी-देऊळवाडा येथे बोरी जिल्हा पंचायतसाठी मतदारसंघाच्या उमेदवार पूनम सामंत यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री सावंत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, बोरी प्रभारी आमदार दाजी साळकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, उमेदवार पूनम सामंत, जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, भाजपचे सर्वानंद भगत, बोरी सरपंच सागर नाईक बोरकर, बेतोडा-निरंकार सरपंच मधू खांडेपारकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मीनानाथ उपाध्ये, प्रसाद प्रभू गावकर, माजी सरपंच जयेश नाईक व इतर पंच उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत यांनी विकसित गोव्याचे उद्दिष्ट साधण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगून बोरीच्या उमेदवार पूनम सामंत आणि शिरोड्याच्या उमेदवार डॉ. गौरी शिरोडकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
शिरोडा वाटचाल साखळीच्या बरोबरीने
यावेळी मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, शिरोडा मतदारसंघ भाजपच्या सरकारच्या मदतीने पुढे विकास करत आहे. बोरी व शिरोडा दोन्ही मतदारसंघाच्या उमेदवार निवडून येतील हा आपला विश्वास आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माझे घर योजनेअंतर्गत प्रत्येकाला स्वतःच्या घराच्या सनदा देण्याचे महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. शिरोडा मतदारसंघ हा साखळी मतदारसंघ बरोबर राज्यात विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.