जनतेचा विकासाला कौल, भाजपचे निर्विवाद वर्चस्व; बॅलेटवर मतदान असूनही विरोधकांना चपराक : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 09:21 IST2025-12-23T09:20:54+5:302025-12-23T09:21:48+5:30
खऱ्या अर्थाने हा ग्रामीण भागातील जनतेचा विजय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जनतेचा विकासाला कौल, भाजपचे निर्विवाद वर्चस्व; बॅलेटवर मतदान असूनही विरोधकांना चपराक : मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात राबविण्यात आलेल्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत गोव्याच्या जनतेने जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला मोठा कौल दिला आहे. २९ जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवत राज्यातील सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. खऱ्या अर्थाने हा ग्रामीण भागातील जनतेचा विजय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने मिळवलेले यश सर्वसामान्य जनतेचा विजय असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे व माजी खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते.
विरोधकांना चपराक : सावंत
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, "ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली असतानाही भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे ईव्हीएमवर आरोप करणाऱ्या विरोधकांना जनतेनेच चपराक दिली आहे." भाजपने यंदा केवळ ४० जागा लढवल्या असून, त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक जागांवर विजय मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. आम्ही ३० उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला होता, कारण आम्हाला जनतेवर विश्वास होता. आज दोन्ही जिल्ह्यांत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. काँग्रेससह अन्य विरोधकांना जनतेने पूर्णतः नाकारले आहे," असेही मुख्यमंत्री म्हणाले.
'त्या' भागात नव्याने संघटनात्मक बांधणी
डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून केंद्र व राज्य समन्वयाने विकासकामे सुरू असून, आता जिल्हा पातळीवर ट्रिपल इंजिन सरकार जनतेसाठी कार्यरत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. युवा व महिला सशक्तीकरणासह संपूर्ण राज्याचा सर्वांगीण विकास हेच भाजपचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले. काही ठिकाणी अत्यंत कमी मतांनी उमेदवार पराभूत झाले असून, त्या भागांत पुन्हा नव्याने संघटनात्मक काम केले जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
शब्द खरा ठरला : दामू नाईक
जिल्हा पंचायत निवडणुकीत ३० पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मी व्यक्त केला होता. जनतेने तो विश्वास सार्थ ठरवत भाजपच्या २९ उमेदवारांना निवडून दिले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे भाजपला हा मोठा विजय मिळाला. विरोधकांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.