भाजप सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी, राज्यात विरोधी युती मजबूत; माणिकराव ठाकरेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:41 IST2025-12-18T11:39:47+5:302025-12-18T11:41:39+5:30
आरजी-आपकडून केवळ काँग्रेसच टार्गेट : पाटकर

भाजप सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी, राज्यात विरोधी युती मजबूत; माणिकराव ठाकरेंचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केवळ आम आदमी पक्षच नव्हे तर रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीदेखील काँग्रेसवर सातत्याने हल्ले करत आहे. केजरीवाल तर गोव्यातील प्रत्येक सभेत काँग्रेसवर टीका करत असून भाजपविरोधात एकही ठोस विधान करत नाहीत. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड वगळता एकही विरोधी पक्ष भाजपवर थेट टीका करत नाही. त्यामुळे हे पक्ष नेमके कोणाच्या फायद्यासाठी काम करत आहेत, हा प्रश्न जनतेला पडला आहे. भाजपविरोधी मतांचे विभाजन करून सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष मदत करण्याचे हे राजकारण आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.
काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व पक्षाचे प्रदेश ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख उपस्थित होते. मतदारांनी सजग राहावे, असे आवाहन पाटकर यांनी केले.
दरम्यान, 'काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मजबूत उमेदवार उभे केले आहेत,' असा दावा ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, 'भाजप सरकार लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. बेकायदेशीर नाइट क्लब सुरू करण्यास परवानगी दिली जाते. निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवेल.
मतविभाजनाचा डाव ओळखा : पाटकर
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, 'आम आदमी पक्ष गोव्यात केवळ विरोधी मतांचे विभाजन करण्यासाठी सक्रिय आहे. प्रत्यक्ष फिल्डवर या पक्षाचे काहीच काम दिसत नाही. आपचे कुठलेही ठोस संघटनात्मक कार्य दिसत नाही. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष केवळ विरोधकांची मते फोडण्यासाठी सक्रिय झाला आहे.
आरजीने आघाडी तोडली
विरोधी पक्षांची आघाडी आरजीने उमेदवार यादीवरून तोडल्याचा आरोप काँग्रेसने केला. माणिकराव ठाकरे म्हणाले की, 'आघाडी स्थापन करण्यासाठी काँग्रेसने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र दोन्ही बाजूंची सहमती आवश्यक असते.
सांताक्रुझ मतदारसंघात काँग्रेसचा झेडपी सदस्य आहे. त्यामुळे या जागेबाबत काँग्रेसने दावा केला. या संदर्भात गोवा फॉरवर्ड, आरजी यांच्यासोबत बैठकही झाली होती. मात्र, आरजीचे मनोज परब यांनी उमेदवार यादी आधीच जाहीर केली होती.