जिल्हा पंचायत निवडणूक: अखेरच्या दिवशी ३२७ अर्ज; आज छाननी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:53 IST2025-12-10T12:53:58+5:302025-12-10T12:53:58+5:30
अर्ज माघारीची उद्या मुदत

जिल्हा पंचायत निवडणूक: अखेरच्या दिवशी ३२७ अर्ज; आज छाननी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काल, मंगळवारी शेवटच्या दिवशी एकूण ३२७ उमेदवारांनी विविध मतदारसंघांत अर्ज दाखल केले. १५९ अर्ज उत्तर गोवा जिल्हा पंचायतींसाठी तर १६८ अर्ज दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींसाठी दाखल करण्यात आले.
अनेक मतदारसंघांमध्ये बहुपक्षीय चुरस तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांची मोठी संख्या दिसून आली. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भाजपा, काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड, आरजी या पक्षांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात आहेत. अपक्षांचीही संख्याही लक्षणीय आहे. आज, बुधवारी दि. १० रोजी अर्जाची छाननी होईल. उद्या, गुरुवार, दि. ११ रोजी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होऊन राज्यात राजकीय वातावरण तापू लागेल.
दरम्यान, गोवा फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपवर जि. पं. निवडणुकीत घराणेशाही आणल्याबद्दल टीका केली. ते म्हणाले की, '१३ डिसेंबरला दिवंगत मनोहर यांच्या समाधीला भाजप नेते भेट देतील, तेव्हा त्यांनी त्यांचे स्वप्न लक्षात ठेवावे आणि श्रीपाद नाईक यांचे पुत्र, सुभाष शिरोडकर यांची मुलगी आणि आमदार आंतोन वास यांच्या पत्नीला दिलेल्या तिकिटांबद्दल फेरविचार करावा. कारण पर्रीकर नेहमीच घराणेशाहीच्या विरोधात होते.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी उमेदवारीसाठी आपल्या मुलाला निवडले. भाजपने समर्पित कार्यकर्त्याकडे दुर्लक्षित केले. खोर्लीत इतर पात्र भाजप कार्यकर्ते नव्हते का? फक्त श्रीपादपुत्राचाच विचार का झाला? सरदेसाई म्हणाले की, 'आरजीपी गोव्यातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष असल्याचा दावा करतो, तरीही मंत्री सुभाष शिरोडकर यांनी त्यांच्या मुलीला आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी त्यांच्या मुलाला तिकीट दिल्यावर गप्प राहतो. असे दिसते की, आरजीपी नेते दिल्लीला गेले आणि सर्वकाही विसरले.'
दरम्यान, नाईट क्लब आग दुर्घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की, सर्व नाइट क्लब बेकायदेशीरपणे चालू आहेत. गोव्यातील सर्व क्लब भाजपच्या राजकीय संरक्षणाखाली बेकायदेशीरपणे चालू आहेत. भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र यावे अशी लोकभावना होती. त्यामुळे आम्ही महायुतीची योजना आखली होती, परंतु काही कारणांमुळे ती झाली नाही. बिहार निवडणुकीतही मैत्रीपूर्ण लढाया झाल्या आहेत आणि त्याचप्रमाणे, गोव्यातही काँग्रेससोबत दोन ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढाई असेल.'
काँग्रेसचे आणखी १५ उमेदवार
जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीने उत्तर आणि दक्षिण गोव्यातील विविध मतदारसंघांसाठी १५ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यांनी मंगळवारी अखेरच्या दिवशी अर्ज भरले. उमेदवार असे : हरमल: नॅटी फर्नांडिस, मोरजी: प्रियांका दाभोळकर, शिवोली: रोशन चोडणकर, शिरसई : नीलेश कांब, ळी, खोर्ली: ग्लेन काब्राल, सेंट लॉरेन्स : उज्ज्वला संतोष नाईक, नुवे: अँथनी ब्रागांझा, कोलवा : व्हेनिशिया कॅलिस्टा कार्वाल्हो, बाणावली : सौ. लुईझा पेरेरा ई रॉड्रिग्स, दवर्ली: फ्लोरिआनो फर्नांडिस, नावेली: मेलिफा कार्बोझ, धारबांदोडा : दीनानाथ आर. गांवकर, हणजूण: योगेश गोवेकर, नगरगाव : नंदकुमार कोपार्डेकर, बोरी : प्रणोती शेटकर.
फॉरवर्डला २ : काँग्रेस ३६ जागा, दोन मैत्रिपूर्ण लढती; काँग्रेस-गोवा फॉरवर्डची युती
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी अखेर काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डने युतीची घोषणा केली. विरोधी आघाडीतून आरजी बाहेर राहिला आहे. काँग्रेसने उत्तर गोव्यात १९ आणि दक्षिण गोव्यात १७ उमेदवार उभे केले आहेत तर गोवा फॉरवर्ड २ जागांवर निवडणूक लढवेल. खोलीं व मोरजी या दोन मतदारसंघात काँग्रेस-गोवा फॉरवर्ड यांच्यात मैत्रिपूर्ण लढती होतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आरजी युतीमध्ये नसल्याबद्दल सरदेसाई म्हणाले की, 'दिल्ली भेटीनंतर आरजीरच्या नेत्यांचे काय झाले ठाऊक नाही. हे नेते रविवारी, सुट्टीदिवशी दिल्लीला गेले. नंतर पत्रकारांना त्यांनी आम्ही गोव्याच्या मतदार यादी विशेष सघन पुनरिक्षणावर (एसआयआर) चर्चेसाठी दिल्लीला गेलो असे सांगितले होते. रविवारी दिल्लीत कोणते कार्यालय उघडे असते हे मला ठाऊक नाही. दिल्लीत काहीतरी 'जादू' घडली असेल हे नक्की.'