गोवा जागतिक चित्रपट निर्मिती केंद्र होणार - मुख्यमंत्री : पणजीत ५६ व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन
By किशोर कुबल | Updated: November 20, 2025 20:15 IST2025-11-20T20:13:52+5:302025-11-20T20:15:00+5:30
आंतरराष्ट्रीय विभाग व इंडियन पॅनोरमा या इफ्फीतील विभागांमध्ये यावर्षी गाजलेले चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार आहे.

गोवा जागतिक चित्रपट निर्मिती केंद्र होणार - मुख्यमंत्री : पणजीत ५६ व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन
पणजी : ‘ गोवा जागतिक चित्रपट निर्मिती केंद्र बनवण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ५६ व्या इफ्फीच्या उद्घाटन प्रसंगी केले.
येथील जुन्या गोमेकॉ इमारतीच्या आवारात झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल्. मुरुगन, केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच ज्येष्ठ तेलगू अभिनेता नंदमुरी बालकृष्णन, अनुपम खेर उपस्थित होते. तुळशीच्या रोपट्याला पाणी देऊन आगळ्यावेगळ्या पध्दतीने उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘इफ्फीसोबत गोव्याचाही विकास झालेला आहे. जागतिक स्तराच्या पायाभूत सुविधा देण्यास आम्ही सज्ज आहोत. चित्रपट निर्माते गोव्यात केवळ नैसर्गिक सौंदर्य असल्यामुळेच नव्हे तर येथील पायाभूत सुविधांमुळे चित्रीकरणासाठी येतात. गोवा नेहमीच सृजनशीलतेला प्राधान्य देतो.’
उद्घाटनानंतर ब्राझिलियन चित्रपट निर्माता गाब्रिएल मास्कारो यांच्या ‘द ब्ल्यु ट्रेल’ या चित्रपटाने इफ्फीचा प्रारंभ झाला. २८ नोव्हेंबरपर्यंत नऊ दिवसांच्या काळात एकूण ८१ देशांचे २७० हून अधिक चित्रपट इफ्फीत दाखवले जाणार आहेत. समारोप सोहळ्यात दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत याला जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय विभाग व इंडियन पॅनोरमा या इफ्फीतील विभागांमध्ये यावर्षी गाजलेले चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय विभागात १६० चित्रपट प्रदर्शित केले जातील. यात १३ जागतिक प्रिमियरचा समावेश असेल. २१ अधिकृत ॲास्कर नामांकन मिळालेले चित्रपट प्रदर्शित केले जातील.