छत्रपती शिवरायांमुळे गोव्याची मंदिरे वाचली: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:32 IST2026-02-20T11:31:32+5:302026-02-20T11:32:21+5:30

सांगे येथे दिमाखदार सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण; स्पिरिच्युअल फेस्टिव्हल सुरू

goa temples were saved because of chhatrapati shivaji maharaj said cm pramod sawant | छत्रपती शिवरायांमुळे गोव्याची मंदिरे वाचली: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

छत्रपती शिवरायांमुळे गोव्याची मंदिरे वाचली: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे : 'पोर्तुगीजांनी आपल्या राजवटीत गोव्यातील जवळपास एक हजाराहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली. मात्र, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सप्तकोटश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला, तेव्हापासून राज्यातील मंदिरे शाबूत राहिली. आता संगमपुरात उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकही अशाच प्रकारे पुढील पाचशे वर्षे चिरंतन राहील' असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

सांगे येथे संगमपूर शिवसम्राज्य समिती सांगे, स्पिरिच्युअल फेस्टिव्हलच्या संयुक्त विद्यमाने आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पुढाकाराने गुरूवारी सांगे महालात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाने झाला.

यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर सद्‌गुरू श्री ब्रम्हेशानंदाचार्य स्वामी, बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, मंडलेश्वर स्वामी सुशिलगिरी महाराज, रामदासी महाराज, भुपेंद्रगिरी स्वामी, राजराजेश्वर स्वामी, निरंजन स्वामी यांसह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांची प्रेरणा सर्वांसमोर जाणे गरजेचे आहे. आता हिंदू धर्म फलरूपात आला आहे. हे स्मारक सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल. राज्यात शिवजयंती उत्सवाला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळातही लोकांचा प्रतिसाद वाढतच राहील. खऱ्या अर्थाने छत्रपतीचे कार्य सगळ्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.' 

सद्‌गुरू बम्हेशानंद महाराज म्हणाले की, आम्ही किती तरी वर्षे गोमंतकात याच क्षणाची वाट पाहत होतो. या सरकारने हे करून दाखवले. त्यांनी सनातन धर्म सर्वांसमोर उभा केला आहे. जर सनातन धर्म टिकला तर अख्ख्या जगाला शांती मिळू शकते. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे राजे होते. त्यांच्यासारखे प्रत्येकाने जगावे, जन्माला येणारे प्रत्येक मूल शिवाजी महाराजांसारखे व्हायला हवे. इथे जसा पुतळा उभारला, तसाच पुतळा विधानसभेतही उभारावा. 

मोहनबुवा महाराज म्हणाले की, रायगडावर राज्यभिषेकावेळी जसे दृश्य होते, तेच आता संगमपुरात पाहायला मिळाले. आम्ही या भूमीला देवभूमी म्हणतो. पण ती आता खऱ्या अर्थाने देशप्रेमी, धर्मप्रेमी झाली आहे.

मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आजही प्रेरणादायी आहे. पोर्तुगीजांनी संगमपूरचे नाव सांगे असे केले. मात्र आता पुन्हा एकदा संगमपूर असे नाव रुढ होत असल्याचा आनंद वाटतो. कोणाचाही विरोध न होता हा भव्य असा पुतळा उभारला गेला. आगामी पाच शतके हे स्मारक लोकांना प्रेरणा देणारे ठरेल.

संगमेश्वर पूजन, महाआरती

सुरुवातीला सांगे कोर्टाजवळून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मोटारसायकल मिरवणुकीला सुरुवात झाली. स्वामीजींनी आरती करून व पुष्पहार घालून याचे स्वागत करण्यात आले. मिरवणूक संगमेश्वर तीर्थक्षेत्रावर आली. तेथे संत-महंत व मान्यवरांच्या हस्ते संगमेश्वर पूजन व महाआरती केल्यानंतर पारंपरिक घोडेमोडणी सादर करण्यात आली. पाईकदेव शिमगोत्सव समितीने ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रेने कलश शिवस्मारक स्थानावर आणला. यावेळी मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले. मूर्तिकार प्रशांत खेडेकर, डिझाइन करणारे दिनेश भंडारी, समितीचे अध्यक्ष संगमेश्वर नाईक यांचा सत्कार केला.

 

Web Title : शिवाजी महाराज ने गोवा के मंदिरों को बचाया: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने कहा कि शिवाजी महाराज के प्रयासों से पुर्तगाली विनाश के बाद गोवा के मंदिरों की रक्षा हुई। सांगे में शिवाजी की एक भव्य प्रतिमा का अनावरण किया गया, जो भावी पीढ़ी को प्रेरित करेगी। कार्यक्रम में धार्मिक नेता और एक जुलूस शामिल थे, जिसमें शिवाजी की विरासत और हिंदू धर्म का जश्न मनाया गया।

Web Title : Shivaji Maharaj saved Goa temples: Chief Minister Pramod Sawant

Web Summary : Chief Minister Pramod Sawant stated Shivaji Maharaj's efforts protected Goa's temples after Portuguese destruction. A grand statue of Shivaji was unveiled in Sange, inspiring future generations. The event included religious leaders and a procession, celebrating Shivaji's legacy and Hindu dharma.