राज्यात 'गोवा टॅक्सी ड्रायव्हर अॅप' सुरू; सुरुवातीच्या ५०० चालकांना २५ लिटर इंधन मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 14:46 IST2025-06-27T14:45:58+5:302025-06-27T14:46:37+5:30

पर्यटन खात्याने ट्विटरवरून हे अॅप सुरु होत असल्याचे जाहीर केले आहे.

goa taxi driver app launched in the state | राज्यात 'गोवा टॅक्सी ड्रायव्हर अॅप' सुरू; सुरुवातीच्या ५०० चालकांना २५ लिटर इंधन मोफत

राज्यात 'गोवा टॅक्सी ड्रायव्हर अॅप' सुरू; सुरुवातीच्या ५०० चालकांना २५ लिटर इंधन मोफत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सरकारने स्थानिक टॅक्सी चालकांना सक्षम बनवण्यासाठी आणि सेवा सुधारण्यासाठी वाहतूक व पर्यटन खात्यांमार्फत 'गोवाटॅक्सी ड्रायव्हर अॅप' सुरू केले आहे.

प्रोत्साहन म्हणून नोंदणी करून अॅप-आधारित ५० फेऱ्या पूर्ण करणाऱ्या पहिल्या ५०० चालकांना २५ लिटर मोफत इंधन दिले जाईल. यात पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीचा समावेश असेल. पात्र होण्यासाठी ड्रायव्हर्सना ३० दिवसांसाठी सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान अॅपवर सक्रिय राहावे लागेल. हा उपक्रम वाहतूक क्षेत्रातील राज्याच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे सरकारने म्हटले आहे. चालकांना १३६४ हेल्पलाइनवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.

पर्यटन खात्याने ट्विटरवरून हे अॅप सुरु होत असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात गोवा ट्रान्सपोर्ट अॅग्रिगेटर मार्गदर्शक मसुदा २०२५ जनतेच्या सूचना, हरकतींसाठी अजून खुला आहे. ३० तारीखपर्यंत सूचना सादर करण्यासाठी मुदत आहे.

टॅक्सी व्यावसायिकांना भीती आहे की, अॅप अॅग्रिगेटरमुळे ओला, उबर कंपन्यांना गोव्यात येऊ शकतात व त्यामुळे स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बुडेल. आतापर्यंत एक हजारहून अधिक टॅक्सी व्यावसायिकांनी सरकारकडे आपल्या हरकती नोंदवून अॅप धोरण रद्दची मागणी केली आहे.
 

Web Title: goa taxi driver app launched in the state