गोव्यात टॅक्सी व्यावसायिकांचा अचानक संप सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 13:27 IST2019-08-02T13:27:34+5:302019-08-02T13:27:41+5:30
ऍप आधारित टॅक्सीसेवेस विरोधासाठी राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी अचानक संप सुरू केलेला आहे.

गोव्यात टॅक्सी व्यावसायिकांचा अचानक संप सुरू
पणजी : ऍप आधारित टॅक्सीसेवेस विरोधासाठी राज्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी अचानक संप सुरू केलेला आहे. राज्य सरकार ऍप आधारित टॅक्सीसेवाच पुरविण्यावर ठाम आहे. तुमचे स्वतंत्र ऍप तयार करा नाहीतर गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सीसेवेमध्ये सहभागी व्हा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले आहे.
स्थानिक टॅक्सी मालक-चालकांचे हित कोणत्याही स्थितीत जपले जाईल, अशी ग्वाहीही सरकारने दिलेली आहे. असे असताना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची निर्णय टॅक्सीवाल्यांनी घेतलेला आहे. गोव्याचा टॅक्सी व्यवसाय जगभर बदनाम आहे. ‘मनमानी भाडे आकारणी’ हा प्रमुख आक्षेप आहे.
समाज माध्यमांतूनही या व्यवसायावर टिकेची झोड उठवली जाते. त्यामुळे मनमानीला चाप लावण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केलेले आहेत. यापूर्वी डिजिटल मीटर लावावे यासाठी सरकारने प्रयत्न केला पण टॅक्सीवाल्यांनी त्यास रस्त्यावर उतरून विरोध केला. आताही ते हेच करत आहेत, त्यांचा विरोध मोडून काढण्याचा निर्धार सरकारने विधानसभा अधिवेशनात बोलून दाखवला आहे.