राज्याला दररोज लागतात १० हजार ६०० सिलिंडर; इंधन, LPG पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 08:43 IST2026-04-11T08:42:42+5:302026-04-11T08:43:26+5:30

तेल विपणन कंपन्यांकडून माहिती; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

goa state requires 10600 cylinders daily it is clear that fuel and LPG supply is smooth | राज्याला दररोज लागतात १० हजार ६०० सिलिंडर; इंधन, LPG पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट

राज्याला दररोज लागतात १० हजार ६०० सिलिंडर; इंधन, LPG पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात पेट्रोल, डिझेल आणि लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) ची उपलब्धता सध्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी असल्याची पुष्टी राज्यातील तेल विपणन कंपन्यांनी केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी वितरणाला प्राधान्य दिले आहे. सध्या, राज्यात दररोज सुमारे १०,६०० घरगुती एलपीजी सिलिंडर वितरित केले जातात. हे प्रमाण अलीकडील भू-राजकीय घडामोडींपूर्वी नोंदवलेल्या वितरण पातळीशी सुसंगत असून सध्याची गरज पूर्ण करणारे आहे अशी माहिती सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांचे राज्यस्तरीय समन्वयक मधुरेंद्र के. पांडे यांनी दिली.

यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांचे राज्यस्तरीय समन्वयक मधुरेंद्र के. पांडे यांनी ही माहिती दिली. पुरवठ्याची परिस्थिती सातत्याने लक्षात ठेवली जात असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच वितरणाला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुरवठ्यातील स्थिरता राखण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन विपणन कंपन्यांचे राज्यस्तरीय समन्वयक पांडे यांनी केले आहे.

स्थलांतरित कामगार तसेच स्थानिक पत्त्याचा पुरावा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिकृत वितरकांकडे ५ किलोचे 'फ्री ट्रेड एलपीजी' सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी वैध सरकारी फोटो ओळखपत्र आणि घोषणापत्र आवश्यक आहे.

राज्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत असून मागणी व वितरण क्षमतेनुसार साठा उपलब्ध आहे. मागणीत झालेली तात्पुरती वाढ नियोजनबद्ध पद्धतीने हाताळण्यात आली आहे.

नागरिकांनी टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अनावश्यक खरेदी टाळावी, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

३०५ ठिकाणी छापे

पुरवठ्याचे सातत्य आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांकडून एलपीजी वितरकांची तपासणी केली जात आहे. साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठ राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत असून आतापर्यंत ३०५ छापे टाकण्यात आले आहेत. अनियमितता आढळलेल्या प्रकरणांमध्ये कारवाईही करण्यात आली आहे, अशी माहिती पांडे यांनी दिली.

ग्राहकांना नोंदणी करण्याचे आवाहन

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून घरगुती एलपीजी वितरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार सिलिंडर वितरण सुरू असून गोव्यात दररोज सुमारे १०,६०० घरगुती एलपीजी सिलिंडर वितरित केले जात आहेत. ग्राहकांनी एसएमएस, मिस्ड कॉल किंवा आयव्हीआरएस प्रणालीद्वारे सिलिंडर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असून योग्य लाभार्थ्यांनाच वितरण सुनिश्चित करण्यासाठी 'डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड' वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

'पीएनजी' वापराला प्रोत्साहन

केंद्र व राज्य सरकारकडून स्वयंपाकाच्या इंथनाचा पर्याय म्हणून 'पाईप्ड नॅचरल गॅस' (पीएनजी) चा वापर प्रोत्साहित केला जात आहे. पणजी, मडगाव आणि फोंडा येथे ही सेवा उपलब्ध असून ग्राहकांना 'गोवा नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड' (उत्तर गोवा) आणि 'इंडियन ऑईल अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेड' (दक्षिण गोवा) यांच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे नोंदणी करता येणार आहे.

Web Title : गोवा: एलपीजी, ईंधन की आपूर्ति स्थिर; प्रतिदिन 10,600 सिलेंडरों की आवश्यकता

Web Summary : गोवा में ईंधन और एलपीजी की आपूर्ति स्थिर है, प्रतिदिन 10,600 एलपीजी सिलेंडर वितरित किए जाते हैं। अधिकारी स्थिति की निगरानी कर रहे हैं, जनता से अफवाहों से प्रेरित होकर घबराहट में खरीदारी से बचने का आग्रह किया गया है। प्रवासियों के लिए 5 किलो के सिलेंडर उपलब्ध हैं। काला बाजारों पर छापे मारे जा रहे हैं, और उपभोक्ताओं को प्रमाणीकरण के साथ सिलेंडर डिलीवरी के लिए पंजीकरण करने के लिए प्रोत्साहित किया जाता है।

Web Title : Goa: LPG, Fuel Supply Steady; 10,600 Cylinders Needed Daily

Web Summary : Goa's fuel and LPG supplies are stable, with 10,600 LPG cylinders distributed daily. Authorities are monitoring the situation, urging the public to avoid panic buying fueled by rumors. 5kg cylinders are available for migrants. Raids target black markets, and consumers are encouraged to register for cylinder delivery with authentication.