राज्य सरकार आता 'अॅक्शन मोड'वर; वागातोरचा रोमिओ लेन क्लब जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:21 IST2025-12-10T13:20:23+5:302025-12-10T13:21:24+5:30

क्लबचा सहमालक अजय गुप्ताला दिल्लीत अटक; नाईट क्लब, रेस्टॉरंट्स-बार, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रॉक, इव्हेंटसची ठिकाणे रडारवर; पाच समित्या स्थापन, गौरव व सौरव लुथरा यांच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस

goa state government now in action mode romeo lane club demolished of vagator | राज्य सरकार आता 'अॅक्शन मोड'वर; वागातोरचा रोमिओ लेन क्लब जमीनदोस्त

राज्य सरकार आता 'अॅक्शन मोड'वर; वागातोरचा रोमिओ लेन क्लब जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी/म्हापसा : हडफडेतील बर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लबमधील आगीच्या दुर्घटनेनंतर सरकारने काल, मंगळवारी 'बुलडोझर अॅक्शन' सुरू करून वागातोर येथील 'रोमियो लेन'चा बेकायदा भाग पाडला. नाईट क्लबांना फायर एनओसी, आसन मर्यादा कठोरपणे लागू केली असून एका आठवड्यात अंतर्गत ऑडिट अनिवार्य केले आहे. सुरक्षा ऑडिटसाठी समितीही स्थापन केल्या आहेत. दरम्यान, नवी दिल्लीत क्लबचा सहमालक संशयित अजय गुप्ता याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती.

'बर्च बाय रोमियो लेन' आग दुर्घटना प्रकरणी कोणालाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ठणकावून सांगितले आहे. गृह खात्याने महसूल खात्याचे सचिव संदीप जॅकिस यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा ऑडिट समिती स्थापन केली. ही समिती नाईट क्लब, बार, इव्हेंट स्थळांवर अग्निसुरक्षा विषयक एसओपीचे योग्य पालन केले जाते की नाही हे तपासून महिनाभरात अहवाल सादर करणार आहे. समितीवर पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा, वित्त खात्याचे संयुक्त सचिव प्रणव भट, बांधकाम खात्यात मुख्य अभियंता संदीप चोडणेकर व अग्निशामक दलाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर सदस्य आहेत. या आस्थापनांना भेटी देऊन या समितीने त्यांच्याकडे आवश्यक ते परवाने तसेच आग सुरक्षा उपाययोजना, अनिवार्य असलेले ना हरकत दाखले, स्ट्रक्चरल स्टेबिलिटी प्रमाणपत्र, इलेक्ट्रिकल सुरक्षा वगैरे तपासावी लागेल. आस्थापनांमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, अग्निशमन उपकरणे, आपत्कालीन निर्गमन मार्ग, विद्युत वायरिंग, गर्दी नियंत्रण उपायही तपासून आवश्यक त्या शिफारशी कराव्या लागतील. उल्लंघने किंवा कमतरता शोधून काढून सुरक्षा उपाययोजनांच्या दृष्टिकोनातून ही समिती एसओपीची शिफारस करील.

संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समित्या

दरम्यान, अन्य एका आदेशाद्वारे सरकारने पर्यटनाशी संबंधित आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्यासाठी पाच संयुक्त अंमलबजावणी आणि देखरेख समित्या स्थापन केल्या आहेत. पेडणे, बार्देश, तिसवाडी, सासष्टी व मुरगाव आणि काणकोण व केपे तालुका किनारपट्ट्यांमध्ये या समित्या कार्यरत असतील. याबाबतच्या आदेशात असे म्हटले आहे की, 'राज्य नागरी सेवेतील वरिष्ठ श्रेणी अधिकारी या समितीच्या अध्यक्षस्थानी असेल तर पोलिस निरीक्षक, अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सदस्य असतील. समिती नाईट क्लब, बार, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, गेस्ट हाऊस, रिसॉर्ट्स, रॉक, इव्हेंटसची ठिकाणे, पर्यटन आस्थापनांची संयुक्त तपासणी करील व दरमहा सरकारला अहवाल सादर करील.

त्यांना पळून जाण्यास भाजपचीच मदत : केजरीवाल

हडफडे नाईट क्लबचे मालक सौरभ व गौरव लुथरा यांना रातोरात थायलंडला पलायन करण्यात भाजपनेच मदत केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ते म्हणाले की, या पलायनात भाजपची मिलीभगत आहे. भाजप सरकारला मला तुरुंगात टाकते आणि २५ निष्पाप लोकांच्या हत्त्येला कारणीभूत असलेल्या नाईट क्लब मालकांना पळू देते. लुथरा बंधू पळाले तेही इंडिगोच्या विमानाने, ज्या कंपनीने भाजपला ब्लॅकमेल केले हे विशेष होय.'

अजय गुप्ताला अटक

गोवा पोलिसांनी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. नवी दिल्लीतील अजय गुप्ता याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात पूर्वीच लूक आऊट नोटीस जारी केली होती. पोलिस पथकाने दिल्लीत त्याच्या घरावर छापा टाकला असता तो तेथून गायब आढळला. यानंतर त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट मिळवण्यात आले होते. अखेर मंगळवारी त्याला नवी दिल्लीत ताब्यात घेण्यात आले.

आर्थिक बाजूही पडताळणार : उपमहानिरीक्षक शर्मा

उपमहानिरीक्षक शर्मा म्हणाल्या की, 'या घटनेनंतर कारवाईसाठी कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा करण्यात आलेला नाही. पोलिसांकडून तातडीने तपास सुरू आहे. क्लबच्या आर्थिक बाजूची पडताळणी केली जाणार आहे.' हणजूण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०५, १२५, १२५(अ), १२५ (ब), २८७ (३) (५) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. तपासादरम्यान राजीव मोडक, विवेक सिंग, हिमांशू ठाकूर, राजीव सिंघानिया आणि भरत सिंग कोहली या पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. भारत कोहली सिंग याला दिल्लीत अटक केल्यानंतर काल मंगळवारी गोव्यात आणण्यात आले. एफएसएल पथकाने घटनास्थळी भेट दिली असून परिसराची सखोल तपासणी केली. फॉरेन्सिक पथकाने काही साहित्य जप्त केले आहे.

गौरव, सौरभ लुथराविरोधात इंटरपोलची नोटीस

हडफडे-बागा येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमधील अग्नितांडव प्रकरणात फरार संशयित गौरव व सौरभ लुथरा बंधुविरोधात इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही तासांत, रविवारी पहाटे साडेपाच वाजता इंडिगोच्या फ्लाइटने दोघेही थायलंडला पळून गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले. दोघाही संशयितांना ताब्यात घेऊन भारतात त्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी गोवा पोलिसांच्यावतीने सीबीआय तसेच इंटरपोलची मदत घेण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून इंटरपोलने अवघ्या दोन दिवसांत नोटीस जारी केली. याबाबत सूत्रांनी सांगितले की, साधारणपणे या प्रक्रियेला किमान एक आठवडा लागतो. मात्र, पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नाने आणि केंद्र सरकारच्या पाठिंब्याने हे काम जलदगतीने पूर्ण होऊ शकले. ही नोटीस संशयितांना शोधण्यासाठी तसेच त्यांना सध्याच्या ठिकाणावरून इतर देशात स्थलांतरित होण्यापासून रोखेल.

...तर एसपींच्या कार्यालयासमोर आंदोलन : मायकल लोबो

स्थानिक सत्ताधारी आमदार मायकल लोबो यांनी हडफडेतील नाइट क्लब आग दुर्घटनेस विविध स्तरावरील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, 'या अधिकाऱ्यांना आधी तुरुंगात टाकून त्यांची चौकशी व्हायला हवी. या अधिकाऱ्यांना कोणी निर्देश दिले याचा तपास व्हावा. याची योग्य चौकशी न झाल्यास मी पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलनास बसेन.'

अग्निकांडाच्या न्यायालयीन तपासासाठी याचिका

'बर्च बाय रोमिओ लेन' नाइट क्लबमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखालील विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ही याचिका १६ डिसेंबर रोजी सुनावणीस येईल. सामाजिक कार्यकर्त्या ऐश्वर्या साळगावकर यांनी ही याचिका सादर केली आहे. या जनहित याचिकेत क्लबमधील आगीच्या घटनेची एका सेवानिवृत्त उच्च न्यायालयीन न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन करून प्रशासनातील निष्काळजीपणा आणि गर्दी व्यवस्थापनातील त्रुटींची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या नाइट क्लबचे कथित बेकायदेशीर बांधकाम, परवान्यांमधील अनियमितता, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यच्युती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्यभरातील अशा बेकायदेशीर बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी याचिकेत समाविष्ट आहे.

निलंबित हळर्णकर, मोंतेरो यांची चौकशी : शर्मा

बर्च बाय रोमिओ लेन क्लबमधील आगीप्रकरणी आतापर्यंत व्यवस्थापनातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. क्लबच्या मालकांना तसेच भागीधारकांना अटक करण्यासाठी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यासाठी देशातील अन्य राज्यांत पथके पाठवण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी हणजूण पोलिस स्थानकात पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर उपस्थित होते.

दरम्यान, निलंबित तत्कालीन पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव शर्मिला मोंतेरो यांची चौकशी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शर्मा यांनी सांगितले की, 'या प्रकरणात प्रत्येकाची भूमिका तपासली जाणार आहे. यापूर्वी अटक केलेल्या व्यवस्थापकांची स्वतंत्र अशी भूमिका होती. पण त्यांनी घटनेदरम्यान निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले. सरकारने सेवेतून निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांपैकी दोघांनी तपासाला सहकार्य केले. पंचायत सचिव रघुवीर बागकर यांची अद्यापही चौकशी करण्यात आलेली नाही. सरपंचांचाही जबाब घेतला जाईल.

 

Web Title : गोवा सरकार आग के बाद हरकत में; अवैध क्लब ध्वस्त, गिरफ्तारियां

Web Summary : गोवा में एक दुखद नाइट क्लब में आग लगने के बाद, सरकार ने एक अवैध निर्माण को ध्वस्त कर दिया और सुरक्षा ऑडिट शुरू कर दिया। दिल्ली में एक क्लब के सह-मालिक को गिरफ्तार किया गया, और लापरवाही की जांच चल रही है।

Web Title : Goa Government Demolishes Illegal Club After Fire; Arrests Made

Web Summary : Following a tragic nightclub fire in Goa, the government demolished an illegal structure and initiated strict safety audits. A club co-owner was arrested in Delhi, and investigations into negligence are underway, including scrutiny of involved officials.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goafireगोवाआग