विकासामध्ये गोव्याची नेत्रदीपक प्रगती; राष्ट्रपती मुर्मू, नागरी स्वागत सोहळ्यात गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 08:56 AM2023-08-23T08:56:33+5:302023-08-23T08:58:39+5:30

राष्ट्रपतींनी तुमका सगळ्यांक माय मोगाचो नमस्कार म्हणत केली भाषणाची सुरुवात.

goa spectacular progress in development praised president draupadi murmu | विकासामध्ये गोव्याची नेत्रदीपक प्रगती; राष्ट्रपती मुर्मू, नागरी स्वागत सोहळ्यात गौरवोद्गार

विकासामध्ये गोव्याची नेत्रदीपक प्रगती; राष्ट्रपती मुर्मू, नागरी स्वागत सोहळ्यात गौरवोद्गार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'स्वयंपोषक विकासाच्या बाबतीत गोव्याने नेत्रदीपक प्रगती केली आहे. येथील समान नागरी कायदा देशासाठी उत्कृष्ट उदाहरण आहे.' असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. मंगळवारी दोनापावल येथे राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित नागरी स्वागत समारंभात त्या बोलत होत्या.

राज्य सरकारतर्फे आयोजित राष्ट्रपतींच्या या नागरी सत्कार समारंभास व्यासपीठावर राज्यपाल पी. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद एस. सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उपस्थित होते.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, गोव्यातील संस्कृती, कॉस्मोपॉलिटन बंधूभाव, सलोखा याचबरोबर आतिथ्यशिलता उदारता वाखाणण्याजोगी आहे. समान नागरी कायद्याने गोव्यात महिला व पुरुषांना समान अधिकार दिलेले आहेत. येथे उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, हे उल्लेखनीय बाब आहे. मनुष्यबळाबाबत मात्र येथील महिलांची भागीदारी वाढली पाहिजे.

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या धर्तीवर 'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रम सुरू करुन राज्य सरकारने तो यशस्वीरित्या पूर्ण केला. त्याबद्दल राष्ट्रपतींनी सरकारचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, 'गोव्यातील प्रतिभाशाली व्यक्तींनी देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. दिवंगत मनोहर पर्रीकर केंद्रात त्यांच्या कार्यकुशलतेमुळे संरक्षण मंत्रीपदापर्यंत पोहोचले.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले की, गोवा ही देवभूमी आहे. हे वैविध्यपूर्ण संस्कृतीने नटलेले राज्य आहे.' राष्ट्रपती मुर्मू यांचा प्रवास सामाजिक कार्यकर्ता, आमदार, मंत्री व राष्ट्रपती असा प्रवास प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते वन निवासींना जमिनींचे हक्क प्रदान करणाऱ्या सनदांचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात रामा गावकर, आनंद हरवळकर, अशोक खांडेपारकर, सुकडो गावकर व तळू बागकर यांना या सनादांचे वितरण करण्यात आले.

राष्ट्रपतींनी तुमका सगळ्यांक माय मोगाचो नमस्कार म्हणत केली भाषणाची सुरुवात. गोव्याच्या सर्वागिण विकासासाठी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा कामगिरीचा केला उल्लेख. गोव्यातील निसर्ग, वनक्षेत्रांचे संवर्धन करण्याचे केले आवाहन. 'देव बरें करू म्हणत भाषणाचा केला समारोप.

हुतात्म्यांना आदरांजली

मंगळवारी दुपारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मंत्री मावि गुदिन्हो यांनी स्वागत केले. राष्ट्रपतींनी पणजीतील आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकाला भेट देऊन हुताम्यांना आदरांजली वाहिली.

आजचा दौरा

आज बुधवारी राष्ट्रपतींचे दोन कार्यक्रम आहेत. राजभवनवर दरबार हॉलमध्ये सकाळी १० वाजता गोवा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला त्या उपस्थिती लावतील. त्यानंतर दुपारी ४ वाजता पर्वरी येथे विधानसभेच्या विशेष अधिवेशनास त्या संबोधित करतील. दुपारी आदिवासी गटांशी वार्तालाप होईल. त्यामुळे त्यांच्या ताफ्याच्या ये-जा करण्याच्या वेळेत राजभवन ते बांबोळी, बांबोळी ते पर्वरी व अटल सेतू वाहतुकीसाठी बंद असेल.

कुणबी साडी भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचा पारंपरिक लामण दिवा, कुणबी साडी व कुणबी शाल देऊन सत्कार केला. राज्यपालांनी स्वतः लिहिलेली पुस्तके त्यांना भेट दिली.


 

Web Title: goa spectacular progress in development praised president draupadi murmu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.