Goa: त्या रेंट ए कारचा परवाना रद्द करणार, एजन्सीलाही कारणे दाखवा नोटीस - वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 03:23 PM2024-02-23T15:23:14+5:302024-02-23T15:24:19+5:30

Goa: गुरुवारी मांडवी पुलावर झालेल्या अपघातास रेंट कारचा पर्यटक चालक पूर्णपणे जबाबदार असून त्या रेंट ए कारचा परवाना रद्द केला जाणार तसेच जबाबदार रेंट ए कार एजन्सीलाही कारणे दाखवा नोटीस पाठवून स्पष्टीकरण घेतले जाणार, असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांना सांगितले.

Goa: Rent-a-car license revoked, show-cause notice to agencies too - Transport Minister Mavin Gudinho | Goa: त्या रेंट ए कारचा परवाना रद्द करणार, एजन्सीलाही कारणे दाखवा नोटीस - वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो 

Goa: त्या रेंट ए कारचा परवाना रद्द करणार, एजन्सीलाही कारणे दाखवा नोटीस - वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो 

- नारायण गावस
पणजी - गुरुवारी मांडवी पुलावर झालेल्या अपघातास रेंट कारचा पर्यटक चालक पूर्णपणे जबाबदार असून त्या रेंट ए कारचा परवाना रद्द केला जाणार तसेच जबाबदार रेंट ए कार एजन्सीलाही कारणे दाखवा नोटीस पाठवून स्पष्टीकरण घेतले जाणार, असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांना सांगितले. आम्ही त्या पर्यटक चालकाचा त्यांच्या राज्यातही वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याची मागणी करणार आहोत. तसेच यापुढे रेंट ए कार एजन्सीसाठी कडक नियम लागू केले जाणार, असे मंत्री म्हणाले.

गेल्या महिन्याभरात राज्यात रेंट ए कार पर्यटक चालकांकडून अपघात वाढले असून यात निष्पाप लाेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे रेंट ए कार देताना एजन्सीने पर्यटकांची पूर्ण तपासणी करावी. त्यांना राज्यातील रस्त्यांचे योग्य मार्गदर्शन करावे. रेंट ए कार देताना त्या चालकाचा परवाना तसेच जर ताे दारुडा तसेच इतर काही त्रुटी असल्यास वाहने त्यांना देऊ नये. यापुढे रेंट ए कारवाल्यासाठी कडक नियमावली लागू केली जाणार आहे. जर नियमांचे पालन केले जात नसेल तर परवाना रद्द केला जाणार असल्याचा इशारा वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला आहे.

मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले, पर्यटक वाढत असल्याने रेंट ए कार परवान्यासाठी वाहतूक खात्याकडे अनेक अर्ज येत आहेत. पण आम्ही गेल्या तीन वर्षांपासून रेंट ए कारचा परवाना बंद केला आहे. तसेच ज्या रेंट ए कार आहेत. त्यांना पाच वर्षानंतर परवाना नुतनीकरण करावा लागतो. त्यावेळी त्यांची पूर्ण तपासणी केली जाते. रेंट ए कारवाल्यांकडे स्वताची पार्किंग जागाही नसते त्यामुळे आपल्याला हवी तिथे कार लावतात. तसेच पर्यटकांकडे गाडी देताना त्याची याेग्य तपासणी करत नसल्याचे समोर आले आहे. या एकूण सर्व प्रकाराची तपासणी हाेणार आहे.

वाहतूक खात्यातर्फे नुकतीच जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या सदस्यांसोबत बैठक झाली आहे. यावेळी राज्यात १२ अपघात प्रवणक्षेत्र शोधले असून त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला तसे आदेशही दिले आहेत. वाहनचालकांनीही वाहतूक नियमांचे पालन करावे. वेगाने गाडी चालवू नये. दारु पिऊन गाडी चालवू नये, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.

Web Title: Goa: Rent-a-car license revoked, show-cause notice to agencies too - Transport Minister Mavin Gudinho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.