अयोध्येत 'गोवा राम निवास' उभारू!: मुख्यमंत्री; ३,८०१ चौरस मीटर जमीन केली संपादित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 08:09 IST2025-03-22T08:09:26+5:302025-03-22T08:09:55+5:30
अयोध्येत 'गोवा राम निवास' उभारण्यासाठी सरकारने जमीन संपादित केली असून लवकरच बांधकाम सुरू केले जाणार आहे.

अयोध्येत 'गोवा राम निवास' उभारू!: मुख्यमंत्री; ३,८०१ चौरस मीटर जमीन केली संपादित
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील राम भक्तांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल, शुक्रवारी केली आहे. अयोध्येत 'गोवा राम निवास' उभारण्यासाठी सरकारने जमीन संपादित केली असून लवकरच बांधकामही सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली अयोध्येत भव्य राम मंदिर साकार झाले व त्यामुळे आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा पुन्हा जागृत झाला आहे. अयोध्येला भेट देणाऱ्या गोवेकरांची 'गोवा राम निवास'मध्ये खात्रीशीर निवासाची सोय होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी तसेच उत्तर प्रदेश सरकार व उत्तर प्रदेश आवास तथा विकास परिषदेचे जमीन उपलब्ध केल्याबद्दल आभार मानले आहेत.
परशुरामभूमी म्हणून प्रसिद्ध असलेला गोवा व अयोध्या यांच्यातील आध्यात्मिक बंध अधिक मजबूत होतील. देशात भक्ती, संस्कृती व एकता वाढविण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अयोध्येत निवासाची सोय होणार असल्याने गोवेकर रामभक्तांनी आनंद व्यक्त केला. गोमंतकीयांनी प्रयागराजला महाकुंभमेळ्यासाठी भेट दिली होती. तेथून अयोध्या जवळ असल्याने अनेक भाविक अयोध्येलाही गेले होते; परंतु तिथे निवासाची सोय नसल्याने हिरमोड झाला होता. आता गोवेकरांची ही गैरसोय दूर होणार आहे.
२३.५७ कोटींचा भूखंड
मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील हा भूखंड एकूण ३,८०१ चौरस मीटरचा आहे. राज्य सरकार या भूखंडासाठी उत्तर प्रदेश आवास तथा विकास परिषदेला २३ कोटी ५७ लाख ३२ हजार ८०९ रुपये देणार आहे.