संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:05 IST2025-12-17T11:04:30+5:302025-12-17T11:05:33+5:30
Goa Police Squats Row IAS Car Check: नियमानुसार कारवाई करणाऱ्या या पोलिसांना दाद देण्याऐवजी एसपींनी त्यांना चक्क उठाबशा घालण्याची शिक्षा दिली.

संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
पणजी : गोव्यातील सांता क्रुझ भागात नियमित नाका तपासणीदरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी एका आयएएस अधिकाऱ्याची कार थांबवून तपासणी केली. संबंधित अधिकाऱ्याने आपली ओळख सांगितल्यानंतरही तपासणी सुरूच ठेवल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला.
तपासणीनंतर संबंधित आयएएस अधिकाऱ्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर उत्तर गोवा जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाका तपासणीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांना उठाबशा करण्याचा आदेश दिला. या आदेशामुळे पोलीस दलात नाराजी व्यक्त करण्यात आली. नियमानुसार कारवाई करणाऱ्या या पोलिसांना दाद देण्याऐवजी एसपींनी त्यांना चक्क उठाबशा घालण्याची शिक्षा दिली.
दरम्यान, या प्रकाराची दखल घेत पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी हस्तक्षेप केला असून संबंधित आदेश अयोग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. शिस्तीच्या नावाखाली अशा प्रकारची शिक्षा देणे नियमबाह्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावताना नियमांचे पालन केले असल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
या घटनेमुळे गोव्यात पोलीस शिस्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अधिकार आणि सामान्य तपासणी प्रक्रियेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.