खाकी नैराश्यात; ३ वर्षांत ५ जणांनी संपवले जीवन, तर ३८ पोलिसांनी सोडली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:12 IST2025-07-30T14:10:52+5:302025-07-30T14:12:02+5:30
विधानसभेत लेखी उत्तरातून माहिती समोर

खाकी नैराश्यात; ३ वर्षांत ५ जणांनी संपवले जीवन, तर ३८ पोलिसांनी सोडली नोकरी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'शांती.. सेवा.. न्याय' हे ब्रीद घेऊन ऑनड्युटी २४ तास कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणाऱ्या पोलिसांना ताण-तणावाचाही सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन वर्षात पाच पोलिसांनी नैराश्यातून जीवनयात्रा संपवली, तर जवळपास ३८ जणांनी खाकीला रामराम ठोकल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत लेखी उत्तरातून मिळाली आहे.
राज्यात पोलिसांवर कामाचा दबाव व ताण वाढत असल्याचे दिसून येत असून एप्रिल २०२२ ते जून २०२५ या तीन वर्षात एकूण ५ पोलिसांनी आत्महत्या केली आहे. त्याचबरोबर १० हजार ७४४ पोलिस कर्मचारी विविध आजारांनी आजारी पडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात लेखी स्वरूपात दिली आहे. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी हा लेखी प्रश्न अधिवेशनात मांडला होता. उत्तरात नमूद केलेल्या माहितीनुसार पाच पोलिस कर्मचाऱ्यांनी कामाच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच कामाचा ताण सहन होत नसल्याने तर काही जणांनी स्वेच्छेने अशा विविध कारणांमुळे ३८ पोलिस कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. सरकारकडून पोलिसांची आरोग्य शिबिरामार्फत तपासणी तसेच इतर तपासण्या केल्या जात आहेत.
राज्यात पोलिसांवरील तक्रारीतही वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांत १०७ पोलिसांना निलंबित केले आहे तर १२ जणांना मोठ्या गुन्ह्यामुळे सेवेतून बडतर्फही करण्यात आले आहे. तसेच या १०७ निलंबनातील एकूण ८० पोलिसांना पुन्हा सेवेत घेतले आहे. मागील तीन वर्षांत पोलिसांच्या तक्रारीत वाढ झालेली आहे. अनेक पोलिसही भ्रष्टाचाराचे आरोप तर काही जणांना सेवेत हलगर्जीपण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
१०,७४४ पोलिस आजारी
राज्यात गेल्या तीन वर्षांत १० हजार ७४४ पोलिस आजारी पडले आहेत. यात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, छातीत दुखणे, मुळव्याध, यकृताचा आजार, हाडांचा आजार, मुतखडा, सांधेदुखी, उलटी, ताप अशा विविध आजारांची नोंद आहे. या आजारांवर सरकारकडून १ कोटी, ९२ हजार ९१४ रुपये खर्च केले असल्याची माहितीही देण्यात आली आहे. वाढता कामाचा ताण, दबाव अशा विविध कारणांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना विविध आजार होताना दिसत आहेत.