Goa Fire: गोवा आग प्रकरणी मोठी कारवाई, लुथरा ब्रदर्सच्या फरार साथीदाराला अटक, मुख्य आरोपी बँकॉकला पसार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 08:58 IST2025-12-10T08:56:58+5:302025-12-10T08:58:11+5:30
Goa Nightclub Fire News: गोवा आग प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली असून लुथरा ब्रदर्सच्या फरार साथीदाराला अटक करण्यात आली.

Goa Fire: गोवा आग प्रकरणी मोठी कारवाई, लुथरा ब्रदर्सच्या फरार साथीदाराला अटक, मुख्य आरोपी बँकॉकला पसार!
गोव्यातील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईटक्लबला लागलेल्या भीषण आगीत २७ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात गोवा पोलिसांनी नवी दिल्ली येथील रहिवासी अजय गुप्ता नावाच्या आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. आगीच्या घटनेनंतर अजय गुप्ता याच्याविरुद्ध देश किंवा राज्य सोडण्यापासून रोखण्यासाठी 'लूकआउट सर्क्युलर' जारी करण्यात आले. मात्र, पोलीस पथक त्याच्या निवासस्थानी पोहोचले, तेव्हा तो बेपत्ता झाल्याचे समजले, ज्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. अखेरीस, त्याला दिल्लीतून ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी गोव्यात आणण्यात आले आहे.
गोव्यातील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये ७ डिसेंबरच्या मध्यरात्री ही दुर्घटना घडली. या भीषण आगीत दुर्दैवाने २७ जणांचा मृत्यू झाला. सुरुवातीला आगीचे कारण सिलिंडरचा स्फोट असल्याचे वाटत होते. परंतु, पुढील तपासात नाईटक्लबच्या परिसरात साठवलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागल्याचे उघड झाले. या घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मुख्य आरोपी बँकॉकला पसार
दरम्यान, नाईटक्लबचे मालक असलेले आणि अपघातानंतर फरार झालेले लुथरा बंधू यांच्यावर आता कायद्याचा फास आवळला जात आहे. दिल्लीतील हे व्यावसायिक गोव्यात अनेक आलिशान नाईटक्लब आणि रेस्टॉरंट्स चालवत होते. आग लागताच त्यांनी देशातून पळ काढला आणि ते बँकॉकला गेल्याची सुत्रांची माहिती आहे.
'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी करण्याची तयारी
गोवा पोलिस आणि केंद्र सरकार आता लुथरा बंधूंचे नेमके ठिकाण आणि हालचाली निश्चित करण्यासाठी इंटरपोलकडे 'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी करण्याची तयारी करत आहेत. यानंतर, त्यांना भारतात परत आणण्यासाठी 'रेड कॉर्नर नोटीस' आणि प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली जाईल.
प्रशासनाचा इशारा
गेल्या काही वर्षांत देशातून पळून गेलेल्या मोठ्या गुन्हेगारांप्रमाणे, लुथरा बंधूंनाही लवकरात लवकर पकडून भारतात आणण्यासाठी सरकार कठोर पाऊले उचलत आहे. या घटनेमुळे देशातील नाईटक्लब्सच्या सुरक्षिततेच्या मानकांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाने आता अशा ठिकाणी सुरक्षेचा अभाव आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.