लुथरांना शासन व्हावेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:40 IST2025-12-12T12:38:52+5:302025-12-12T12:40:36+5:30
काही राजकारणी अशा व्यवसायात गुप्त पार्टनर होतात.

लुथरांना शासन व्हावेच
अपघात कुठेही होऊ शकतो; पण अपघात होईल अशी पोषक व अनुकूल स्थिती निर्माण करणे हा गुन्हा आहे. हडफडेच्या बर्च बाय रोमियो लेन नाइट क्लबने अशीच स्थिती निर्माण केली होती. त्या क्लबच्या जागेची कुणीही पाहणी केली तर ही गोष्ट पटेल. आत पर्यटक किंवा लोकांना जाण्यासाठी तुलनेने छोटा दरवाजा. खाजन जमीन व मिठागरांवर उभारलेला हा नाइट क्लब. आणि सर्वांत धोकादायक गोष्ट म्हणजे ज्वलनशील साहित्य वापरून क्लबची उभारणी केली होती. माडांची चुडते (झावळ्या), सगळे लाकडी साहित्य, सुंभ, गोणपाट (साक) वगैरे. हे तर पेटणारच. एरवी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या लुथरा यांना हे कळायलाच हवे होते. आम्ही कायमस्वरूपी नव्हे तर तात्पुरते स्ट्रक्चर उभे केले आहे, असे दाखविण्यासाठी पूर्ण काम लाकूड वापरून केले गेले होते. दिल्ली वगैरे भागातील मोठे रेस्टॉरंट व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक व बिल्डर गोव्यात येतात आणि वाट्टेल तसे बांधकाम करतात, वाट्टेल त्या जमिनी ताब्यात घेतात. अर्थात गोव्याची शासकीय यंत्रणा व काही राजकारणी यात सामील असतातच. म्हणून हे शक्य होते. काही राजकारणी अशा व्यवसायात गुप्त पार्टनर होतात.
लुथरा आणि त्या नाइट क्लबचे अन्य भागीदार किंवा मालक, लायसन्सी यांनी याच स्थितीचा गैरफायदा घेतला. गोव्याची भ्रष्ट व्यवस्था व यंत्रणा आपल्याला हवी तशी वाकवता येते हे त्यांना कळले होते. स्थानिक ग्रामपंचायतीने दिलेला डिमॉलिशन आदेशदेखील त्यांना रोखू शकला नाही. आगीत पंचवीस जिवांचे बळी गेले असताना त्याच पहाटे लुथरा बंधू थायलंडला पळ काढतात, हे आणखी धक्कादायक आहे. आग लागून दोन तासदेखील झाले नव्हते. केवळ ९० मिनिटांच्या आत लुथरा बंधूनी विमान तिकिटे बुक केली असे उघड झाले आहे. थायलंडला जाण्याचा निर्णय त्यांनी आगीत लोक पोळले जात असतानाच घेतला. कर्मचारी व पर्यटक मेले, त्यांचा जीव गेला. आता लुथरा बंधू किंवा या प्रकरणी अटक झालेले अन्य जबाबदार घटक यांना कितीही मोठी शिक्षा झाली म्हणून पंचवीस जीव परत मिळणार नाहीत. मात्र गोव्याच्या सर्व यंत्रणेला, भ्रष्ट राजकारण्यांना व बर्च नाइट क्लब व्यावसायिकांना योग्य तो धडा मिळायला हवा. यासाठीच वाटते की, लुथरा बंधूंना गोव्यात हडफडे येथे आणून उलटे टांगावे. गोव्यातील काही राजकारण्यांनाही तशीच शिक्षा देण्याची वेळ आता आलेली आहे.
अग्निशामक यंत्रणेची परवानगी किंवा एनओसी नसताना हा क्लब चालत होता, असे सरकार निर्लज्जपणे सांगते. टीसीपीचीही मान्यता नव्हती. तिथे जाऊन पाहणी करावी असे सरकारी यंत्रणेला कधीच वाटले नाही. मुळात बर्च नाइट क्लबविरुद्ध तक्रारी होत्या. तिथे अपघात घडणार असे पणजीतील एका प्रसिद्ध वकिलांनी जाहीरपणे सांगितले होते. मात्र सरकारच्या सर्व यंत्रणांनी कान व डोळे बंद केले होते. आता मांडवी नदीतील कॅसिनो जहाजातील जुगाराच्या जागा खूप सुरक्षित आहेत, असे तोंडी प्रमाणपत्र काहीजण देतात. सामान्य माणसाचे साधे छोटे बेकायदा बांधकाम लगेच मोडून टाकले जाते; पण बड्या धेंडांना सुरक्षेची हमी मिळते. कॅसिनोंमध्ये एखाद्या दिवशी आग दुर्घटना घडली तर हजारो पर्यटक कुठे पळतील?
वास्तविक सरकारने आपल्या सर्व यंत्रणा सर्व कॅसिनोंमध्ये पाठवून एकदा नीट तपासणी करून घेण्याची गरज आहे. घाईघाईत या कॅसिनोंना सरकारने त्या जागा सुरक्षित असल्याचे तोंडी प्रमाणपत्र देऊन टाकू नये. नाइट क्लबमध्ये अग्नितांडव घडले तेव्हाच सर्वांना कळले की तो क्लब कुठे बांधला गेला आहे आणि तिथे धोकादायक आणि व्हेंटिलेशन नसलेला तळमजला होता वगैरे. कॅसिनोंमध्ये मुख्यमंत्र्यांनी एकदा नव्याने अग्निशामक यंत्रणा पाठवून पाहावे.
काल, गुरुवारी सकाळी लुथरा बंधूंना थायलंडमध्ये तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले. केंद्र सरकारच्या विनंतीवरून ही कारवाई केली गेली. वास्तविक या बंधूंनी पळ न काढता दिल्लीतच राहून पोलिस तपासाला सहकार्य करायला हवे होते. निदान पंचवीस निष्पाप व्यक्तींचा जीव गेला हे तरी लक्षात घ्यायला हवे होते. आपणदेखील व्हिक्टीम आहोत किंवा घटना घडली तेव्हा आम्ही क्लबमध्ये नव्हतो, असे दावे त्यांनी करणे हा निर्दयीपणाच आहे.