लुथरा बंधूंचे प्रत्यार्पण कागदपत्रांसाठी अडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 13:35 IST2025-12-13T13:34:19+5:302025-12-13T13:35:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबचे मालक सौरभ व गौरव लुथरा यांना ...

लुथरा बंधूंचे प्रत्यार्पण कागदपत्रांसाठी अडले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबचे मालक सौरभ व गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये ताब्यात घेतल्यानंतर भारतात आणण्यास प्रत्यार्पणाबाबतीत प्रशासकीय अडथळा आला आहे. दोघांना भारतात आणण्यासाठी इमर्जन्सी ट्रॅव्हल सर्टिफिकेटची आवश्यकता असून हे प्रमाणपत्र जारी करेपर्यंत थायलंडमधून या दोघांना देशाबाहेर पाठवले जाऊ शकत नाही, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
थायलंडच्या न्यायालयीन व प्रशासकीय कार्यपद्धती पूर्ण झाल्याशिवाय प्रत्यार्पण शक्य नाही. इमर्जन्सी ट्रॅव्हल सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आणि स्थानिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच दोघांना भारतात परत पाठवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हडफडेंतील वरील नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर दोघेही फुकेट-थायलंड येथे पसार झाले होते. भारत सरकारने पासपोर्ट रद्द केल्याने लुथरा बंधूकडे प्रवासासाठी वैध दस्तऐवज उरले नाहीत आणि ते थायलंडमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करून राहिलेले रहिवासी ठरले. त्यांना थायलंडच्या इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतले.
शनिवारी, दि. ६ रोजी घडलेल्या अग्निकांड प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अटक केलेल्यांपैकी क्लबचे व्यवस्थापक भरत कोहली याच्या पोलिस कोठडीत म्हापसा न्यायालयाने सहा दिवसांची वाढ केली. अग्निकांडामध्ये २५ जणांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणात मुख्य संशयित तथा क्लबचे मालक गौरव व सौरभ लुथरा यांना थायलंडमध्ये गुरुवारी ताब्यात घेतले. भारत सरकारने त्यांचा पासपोर्ट रद्द केल्यानंतर ही कारवाई झाली आहे.
इमर्जन्सी ट्रॅव्हल सर्टिफिकेट म्हणजे...
इमर्जन्सी ट्रॅव्हल सर्टिफिकेट भारतीय दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाकडून दिला जाणारा एक विशेष प्रवासी दस्तऐवज होय. हे प्रमाणपत्र त्या व्यक्तींना दिले जाते ज्यांचे पासपोर्ट हरवले आहेत, चोरीला गेले आहेत किंवा रद्द करण्यात आले आहेत आणि ज्यांना तातडीने भारतात परत येण्याची आवश्यकता आहे. हे सर्टिफिकेट म्हणजे एकदाच वापरता येणारा दस्तऐवज होय. तो पासपोर्ट नव्हे. स्थानिक कायदेशीर प्रक्रियेनंतरच ते जारी केले जाते. लुथरा बंधूंच्या प्रत्यार्पणासाठी याची प्रतीक्षा सरकारला आहे.
वैध दस्तऐवज गरजेचे
इमर्जन्सी ट्रॅव्हल सर्टिफिकेटने भारतात प्रवेश मिळतो, परंतु यावर आंतरराष्ट्रीय प्रवास किंवा तिसऱ्या देशात जाणे शक्य नसते. कोणत्याही नागरिकाला परत पाठवण्यासाठी त्या व्यक्तीकडे वैध प्रवासी दस्तऐवज असणे आवश्यक असते. लुथरा बंधूंकडे ते नाहीत.
बनावट कागदपत्रांच्या आधारे परवाने
लुथरा बंधूंनी बर्च बाय रोमियो लेन क्लबसाठीचे परवाने मिळवताना जागेच्या बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे परवाने देताना या कागदपत्रांची योग्य ती पडताळणी झाली नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
५० जणांचे जबाब
अग्निकांड प्रकरणी गोवा पोलिसांनी आतापर्यंत ५० जणांचे जबाब घेतले आहेत. यामध्ये क्लबचे अधिकारी, कामगार तसेच पीडितांचा समावेश आहे.