सारीपाट, सदगुरू पाटील, संपादक, गोवा
२०२७ साली होणाऱ्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीची तयारी आता सगळ्याच पक्षांनी हळूहळू सुरू केली आहे. सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येण्याची गरज काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत, मात्र फुटीर आणि पक्षबदलू राजकारण्यांचे भवितव्य घडविण्यासाठी विरोधी युतीचा वापर होऊ नये, असे आरजीच्या मनोज परब यांना वाटते. 'आप'ने एकला चालो रे ची भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. आता तीन आमदार असलेला आणि तरी सर्वांत मोठा विरोधीपक्ष काँग्रेस काय भूमिका घेतो, यावर युतीचे भवितव्य ठरेल.
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने आपली भूमिका कालच्या शुक्रवारी खूप स्पष्टपणे मांडली आहे. मनोज परब किंवा वीरेश बोरकर यांनी मांडलेले मुद्दे दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. त्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, पण त्यांच्यासारखी टोकाची भूमिका घेणेदेखील इतर पक्षांना परवडणारे नाही, हेही तेवढेच खरे. आरजीच्या नेत्यांना टोकाची भूमिका घेणे राजकीयदृष्ट्या परवडते, कारण तो पक्ष फ्रेश आहे, त्या पक्षावर कुणाचे सध्या ओझे नाही. आरजीकडे ९० हजारहून अधिक मते आहेत, असा त्यांचा दावा आहे. कारण २०२२ च्या निवडणुकीत आरजीने तेवढी मते घेऊन दाखवली आहेत. विरोधी आघाडी तुटू नये, युती कायम राहावी असे आरजीला वाटते. मात्र फुटीर आणि पक्षबदलू राजकारण्यांचे भवितव्य घडविण्यासाठी विरोधी युतीचा वापर होऊ नये, असे मनोज परब म्हणतात. आमदार वीरेश बोरकरही त्याच मताचे आहेत.
माजी मंत्री इजिदोर फर्नाडिस यांना गोवा फॉरवर्ड पक्षाने जवळ केले. इजिदोरला गोवा फॉरवर्डने प्रवेश दिल्याने आरजीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. डिफेक्टर्सना विरोधी युतीचे व्यासपीठ जर दिले जात असेल तर विरोधकांच्या युतीवर लोकांचा विश्वास राहणार नाही, ही चिंता दुर्लक्ष करण्यासारखी नाही. मात्र सत्ताधारी भाजपशी टक्कर देण्यासाठी विरोधी युतीला मध्यममार्ग निवडावा लागेल, असे अनेक राजकीय अभ्यासकांना वाटते. जास्त फुटिरांना जर विरोधी युतीने आश्रय दिला तर लोकांची नाराजी वाढेल हे खरे आहे. मात्र पूर्णपणे नवे चेहरे घेऊन निवडणूक जिंकता येते का हे देखील आरजीला तपासून पाहावे लागेल.
गोमंतकीयांना फुटिरांविषयी राग आहे यात शंकाच नाही. इजिदोर फर्नाडिस किंवा अन्य काही फुटिरांना काँग्रेस पक्ष आता तिकीट देण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे अन्य पक्षांमध्ये हे फुटीर जाऊ पाहतात हे लोकांच्या लक्षात येते. आरजी हा तुलनेने फ्रेश पक्ष आहे. आरजीच्या राजकीय जीवनातील दुसरी विधानसभा निवडणूक म्हणजे २०२७ ची निवडणूक. आरजीच्या तिकीटावर आपल्याला आमदार व्हायचे आहे, असे बोलणारे युवक बार्देश, तिसवाडी व सासष्टीत अलीकडच्या काळात आढळून येतात. आरजीलाही कळून चुकलेय की विरोधी युती टीकली तर कदाचित आपलेही भवितव्य वेगाने आकार घेऊ शकते. विरोधी युती टीकली तर गोवा फॉरवर्डलाही फायदा होईल. फॉरवर्डचे काही इच्छुक उमेदवार काँग्रेसची एकगठ्ठा मते मिळवू पाहतात. एकंदरीत विरोधी युतीसाठी यापुढे कसरतीचाच मार्ग आहे. ही कसरत यशस्वी होईल काय हे येणाऱ्या काळात कळेल. तूर्त विरोधकांची युती हलू लागलीय. युतीचे बारसे होण्यापूर्वी काही नेत्यांकडून घटस्फोटाची भाषा सुरू झालेली दिसते.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना युती हवी, आरजीच्या नेत्यांनाही युती हवी आणि विजय सरदेसाई यांनाही युती मान्य आहे. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची भूमिकाही यापुढे महत्त्वाची ठरणार आहे. केवळ तीनच आमदार असले तरी, काँग्रेस हाच गोव्यात सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. राज्यात अठरा मतदारसंघ असे आहेत, जिथे काँग्रेसने कुणालाही उभे केले तरी चार ते पाच हजार मते मिळतातच. काँग्रेस पक्ष सहजासहजी काही जागा आरजी किंवा गोवा फॉरवर्डला सोडण्यासाठी तयार होणार नाही. काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची सवय अशी आहे की शेवटच्या क्षणापर्यंत मित्र पक्षांसोबत चर्चा करत राहायचे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस येईपर्यंत काँग्रेसचे जागा वाटप कधी नीट होतच नसते. यामुळे युतीचे घटक कंटाळतात.
आता झेडपीसाठी विजय सरदेसाई यांनी आपले काही उमेदवार निश्चित केले आहेत. आरजीचेही काही उमेदवार तयार आहेत. आप तर काँग्रेसच्या नादाला लागला नाही, आप पक्षाने स्वतःचे उमेदवार जाहीर करून प्रत्यक्ष प्रचार काम सुरू केले. आपने स्वतंत्र वाट धरली आहे. काँग्रेसवर किती काळ विसंबून राहणार हा प्रश्न आहेच. आता गोवा फॉरवर्ड व आरजी हे दोनच पक्ष काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत. मात्र मनोज परब म्हणतात त्याप्रमाणे विरोधी युतीच्या आश्रयाला जर फुटीरच जास्त संख्येने येऊ लागले तर युतीला तडे जातील.
युती तुटली किंवा दुभंगली किंवा संपली तर मग २०२२ च्या निवडणुकीत आणि २०२७ च्या निवडणुकीत काही फरक नसेल, असे राजकीय विश्लेषक या नात्याने आम्हाला वाटते. अर्थात आरजीची भूमिका कुणालाही पटण्यासारखी आहे. इजिदोरपुरते ठीक आहे पण यापुढे अधिक फुटीर जर गोवा फॉरवर्डमध्ये किंवा काँग्रेसमध्ये आले तर युती टीकूच शकणार नाही. मग आरजी पक्ष स्वतःची वेगळी वाट धरील, हे आता सर्वांच्याच लक्षात येते. आरजीने अजून तरी गोंयकारपणाचा मुद्दा प्रामाणिकपणे हाती घेतलेला आहे. गोव्यातील अनेक मतदारांना आरजीकडून चांगल्या अपेक्षा आहेत.
राजकारणात दोन अधिक दोन चार असे होत नसते. बिहारमध्ये भाजपने किंवा नितीश कुमार यांनी ज्यांना तिकीट देऊन निवडून आणले, त्यापैकी अनेकांची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. महाराष्ट्रात भाजपने जे प्रयोग केले, त्यापैकी अनेक नेत्यांना इतिहास वादग्रस्त आहे. नारायण राणेंपासून अनेकांचे नाव त्याबाबत घेता येईल. गोव्यात खरी निवडणूक २८ विधानसभा मतदारसंघांमध्येच आहे. कारण उर्वरित बारा मतदारसंघांमध्ये पुन्हा कोण निवडून येतील हे लोकांना पूर्णपणे ठाऊक आहे.
ताळगाव, पणजी, पर्वरी, म्हापस, साखळी, मये, वाळपई, पर्ये, मडगाव, फातोर्डा असे बारा मतदारसंघ आहेत, जिथे कोणता नेता अधिक प्रभावी आहे किंवा कोणता राजकीय पक्ष अधिक मते घेत आला आहे, हे थोडा अभ्यास करूनही कळून येते. त्यासाठी विरोधी युतीने एकत्रितपणे अगोदर प्रोफेशनल यंत्रणेकडून सर्वेक्षण करून घ्यावे. केवळ तीस मतदारसंघांमध्येदेखील अत्यंत गंभीरपणे व तटस्थपणे विरोधी युतीने सर्वे करून घेतला तर सिट शेअरींग करणे विरोधकांना सोपे होणार आहे.
भाजपचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. पूर्वी एक प्राथमिक सर्वेक्षण त्या पक्षाने करून घेतलेले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजप ४० टक्के उमेदवार बदलणार आहे. म्हणजे भाजपच्या ४० टक्के विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार नाही, अशी माहिती मिळते. सर्व राज्यांत भाजप असे प्रोफेशन प्रयोग करतो व हे प्रयोग योग्यच आहेत. हे प्रयोग यशस्वी होतात. जो जिंकू शकतो, त्यालाच भाजप तिकीट देतो हा प्रॅक्टीकल अॅप्रोच आहे. आजच्या काळात राजकारणात केवळ भावना चालत नाही, कठोर समीक्षा करून उमेदवाराकडे खरेच जिंकण्याची क्षमता आहे काय, हे पहावे लागते.
न जिंकणारे उमेदवार घेऊन मगो पक्ष ९० च्या दशकात निवडणुका लढवत होता. त्यामुळेच मगो पक्षाचा पाया पूर्णपणे हलला. रमाकांत खलप किंवा काशिनाथ जल्मी वगैरे नेते कधी सर्वेक्षण करून घेत नव्हते. तिच गोष्ट नंतर काँग्रेसने केली. प्रोफेशनल किंवा शास्त्रीय पद्धतीने सर्वे करून न घेताच प्रतापसिंग राणे, लुईझिन फालेरो, विली डिसोझा वगैरे नेते तिकीट वाटप करत होते.
काँग्रेसला केवळ ख्रिस्ती मते मिळायची म्हणून तो पक्ष थोडा टीकून राहिला. आता आरजी, आप, गोवा फॉरवर्ड त्या ख्रिस्ती मतांचे वाटेकरी झाले आहेत, शिवाय भाजपकडेही बरीच ख्रिस्ती मते वळली आहेत. कारण भाजपने मोठ्या हुशारीने ख्रिस्ती आमदारांनाही जवळ केले. ख्रिस्ती उमेदवारांना भाजप तिकीटे देऊ लागला. यामुळे काँग्रेस पक्ष गारद झाला. २०२७ च्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांना शेवटची संधी आहे, जर युती टिकली तर विरोधक टिकतील नाही तर २०२७साली निकाल काय लागेल हे पुढील सहा महिन्यांत स्पष्ट होईलच.
Web Summary : Goa's opposition parties contemplate alliances for 2027 elections amid concerns of opportunism. RG emphasizes integrity, cautioning against accommodating defectors. Congress's role is crucial. The future of the opposition hinges on unity, strategy, and voter trust.
Web Summary : गोवा में 2027 के चुनावों के लिए विपक्षी दलों के गठबंधन पर विचार हो रहा है, जिसमें अवसरवाद की चिंता है। आरजी ने अखंडता पर जोर दिया, दल-बदलुओं को समायोजित करने के खिलाफ चेतावनी दी। कांग्रेस की भूमिका महत्वपूर्ण है। विपक्ष का भविष्य एकता, रणनीति और मतदाता विश्वास पर निर्भर करता है।