व्रतस्थ धोंडांनी संयम सोडला अन् सर्वत्र गोंधळ उडाला; भाविकाने सांगितली चेंगराचेंगरीची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 08:39 IST2025-05-04T08:37:01+5:302025-05-04T08:39:28+5:30
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात बेजबाबदार धोंडांमुळे चेंगराचेंगरी झाली असून प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून आपण बाहेर पडल्याची भावना मये येथील महादेव ठाणेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.

व्रतस्थ धोंडांनी संयम सोडला अन् सर्वत्र गोंधळ उडाला; भाविकाने सांगितली चेंगराचेंगरीची कहाणी
प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: देवीच्या जत्रोत्सवावेळी घडलेली घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. पूर्वी लईराईच्या जत्रोत्सवातील धोंडांची संख्या अत्यंत कमी होती. पण आज प्रत्येकाला धोंड व्हावेसे वाटते. लहान मुलांना सुद्धा धोंड बनवले जाते. देवीचे व्रत हे प्रत्येकाने करावे, पण धोंडांच्या संख्येवर व वागणुकीवर नियंत्रण हवे. बेजबाबदार धोंडांमुळे कालची चेंगराचेंगरी झाली असून प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून आपण बाहेर पडल्याची भावना मये येथील महादेव ठाणेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.
ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे धोंडांच्या दोन गटात धक्काबुक्की झाली. त्यातून चेंगराचेंगरी घडल्याचे ठाणेकर यांनी सांगितले. त्या चेंगराचेंगरीत आपणही सापडलो होतो. पण रस्त्याच्याकडेला लागून थाटलेल्या स्टॉलमध्ये उडी मारल्याने आपण वाचलो, असेही ठाणेकर म्हणाले. चेंगराचेंगरीत मृत्यू झालेले यशवंत केरकर हे माझे भावोजी असल्याचेही त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले.
अग्निदिव्याच्या दिशेने जात असताना धक्काबुक्की होऊन धोंड तसेच लोक एकमेकांवर खाली पडले. आपण वेळीच उडी मारून बाजूला गेलो नसतो तर आपणही त्यात अडकलो असतो. आपल्या सोबत असलेल्या काही लोकांनी अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. आपल्या डोळ्यादेखत एका महिलेच्या अंगावरून लोक जात होते. पोलिसांनी संपूर्ण ताकद लावत गर्दीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळल्याचे ठाणेकर म्हणाले.
चेंगराचेंगरीत मृत्यू झालेले यशवंत केरकर हे मेहनती होते. शेतात मेहनत करीत होते तसेच फावल्या वेळेत रंगकाम किंवा इतरही कामे करीत होते. त्यांना दोन लहान मुले असून मुलगी इयत्ता पाचवीत तर मुलगा इयत्ता तिसरीत शिक्षण घेत आहे. सांत्वनपर भेटीस आलेल्यांची संख्या फारच मोठी होती.
डोळ्यांदेखत हे घडले...
तळीवरून आंघोळ करुन होमकुंडाच्या ठिकाणी जात असताना ही घटना ३.३० च्या सुमारास घडली. ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथून होमखंडात जाण्याऱ्या धोंडांच्या दोन रांगा करण्यात आलेल्या होत्या. बाजूला दोरखंड लावण्यात आलेले. तर मागच्या बाजूला पुढच्या दोन रांगांमध्ये जाण्यासाठी धोंडांच्या ७ रांगा तयार झाल्या होत्या. काही धोंडांनी रस्त्यावरील वाट अडवून ठेवली होती. त्यातून वाद निर्माण झाला, त्याचवेळी काही धोंडानी बेताचा वापर करुन मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे ठाणेकर यांनी सांगितले.