गोवा बनतोय ‘किलर स्टेट’; पर्यटकांनो सावधान, जीवाशी खेळ करू नका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:50 IST2025-02-13T08:49:38+5:302025-02-13T08:50:01+5:30
राज्याची लोकसंख्या केवळ १६ लाख असली तरी वर्षाकाठी सव्वाकोटी पर्यटक गोव्यात येतात. वाढत्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

गोवा बनतोय ‘किलर स्टेट’; पर्यटकांनो सावधान, जीवाशी खेळ करू नका...
किशाेर कुबल
पणजी : वाढते रस्ता अपघात आणि बुडून मरण पावण्याच्या घटना यामुळे गोवा ‘किलर स्टेट’ बनला आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात राज्यात रस्ता अपघातांमध्ये १,०२२ बळी गेले. तब्बल १३,७६५ अपघातांची नोंद या कालावधीत झाली. जगाच्या नकाशावर गोवा हे लौकिकप्राप्त पर्यटनस्थळ म्हणून झळकत असल्याने देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत असतात.
राज्याची लोकसंख्या केवळ १६ लाख असली तरी वर्षाकाठी सव्वाकोटी पर्यटक गोव्यात येतात. वाढत्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अधिकृत माहितीनुसार पाच वर्षांत नोंद झालेल्या १३,७६५ रस्ता अपघातांपैकी ९२४ अपघात जीव घेणारे ठरले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, ७० टक्के बळी दुचाकी अपघातातील असतात. अनेकदा भीषण अपघातांमध्ये दुचाकी चालवणारा, तसेच मागे बसलेली व्यक्तीही प्राण गमावून बसते. त्यामुळे दोघांनीही हेल्मेट परिधान करणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
गेल्या वर्षी बुडताना वाचवले ६३९ पर्यटकांचे प्राण
दृष्टी लाइफ सेव्हिंगच्या जीवरक्षकांनी गेल्या वर्षी ७६४ घटनांमध्ये ६३९ जणांना बुडण्यापासून वाचवले. याचा अर्थ दररोज सरासरी दोघांचे जीव वाचले. यात सर्वाधिक ११९ पर्यटक कर्नाटकातील होते. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील १०६ पर्यटकांचा क्रमांक लागतो. बुडण्यापासून वाचवण्यात आलेल्या १२० परदेशी पर्यटकांमध्ये प्रामुख्याने ७० रशियन आणि १६ ब्रिटिश नागरिक होते.
५ वर्षांत १०५ पर्यटक बुडाले
गेल्या पाच वर्षांत गोव्यातील समुद्र किनारे, नद्या, तसेच धबधब्यांवर १०५ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. दक्षिण गोव्यात २१ जणांनी प्राण गमावले. मद्यपान करून समुद्रात उतरणे किंवा धबधब्यावर जाणे यामुळे दुर्घटना घडतात. दृष्टी लाइफ सेव्हिंगचे ६०० जीवरक्षक किनारे व धबधबे मिळून ४१ ठिकाणी सेवा देत आहेत.
वाहन चालकांना विशेषत: दुचाकी चालवणारे, तसेच मागे बसणारी व्यक्ती अशा दोघांनीही हेल्मेट वापरावे, वेगाने वाहन चालवू नये, मद्यपान करून वाहन चालवू नये यासाठी पोलिस जागरूक राहून दंडात्मक कारवाई करत असतात - चेतन सावलेकर, वाहतूक पोलिस निरीक्षक, पणजी