गोवा आयआरबीचे जवान त्रिपुरा-मेघालयात, आदेशाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 20:02 IST2018-01-23T20:02:19+5:302018-01-23T20:02:30+5:30
मेघालय व त्रिपुरा येथे होणा-या विधानसभा निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गोवा पोलिसांच्या भारतीय राखीव बटालियनच्या ९० जवानांची एक कंपनी त्रिपुरा व मेघालयात निघण्याच्या तयारीत असून, केवळ आदेश मिळण्याची प्रतीक्षा आहे.

गोवा आयआरबीचे जवान त्रिपुरा-मेघालयात, आदेशाची प्रतीक्षा
पणजी: मेघालय व त्रिपुरा येथे होणा-या विधानसभा निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गोवा पोलिसांच्या भारतीय राखीव बटालियनच्या ९० जवानांची एक कंपनी त्रिपुरा व मेघालयात निघण्याच्या तयारीत असून, केवळ आदेश मिळण्याची प्रतीक्षा आहे.
बटालियनच्या ९० जवानांना त्यासाठी सूचना देण्यात आल्या असून, सज्जता ठेवण्यास सांगितली आहे. तसेच त्यांना रायफल्स व इतर साहित्य ताब्यात घेण्यास सांगितले आहे. पैकी बहुतेक जवानांनी मंगळवारी रायफल्स ताब्यात घेतल्या आहेत.
पुढील आठवड्यातही त्यांना रवाना होण्याची आज्ञा दिली जाऊ शकते. अद्याप अधिकृत आदेश न निघाल्यामुळे तूर्त कुणी रेल्वे तिकीट वगैरे आरक्षित केलेली नाही. याविषयी माहिती देताना आयआरबी व प्रशिक्षण विभागाचे प्रमुख अधीक्षक विश्राम बोरकर यांना विचारले असता त्यांनी आयआरबीची एक कंपनी इशान्येकडील देशात रवाना होणार हे निश्चित असल्याचे सांगितले. अद्याप अधिकृत आदेश न आल्यामुळे जाण्याची तारीख ठरली नाही. परंतु आदेश कधीही येऊ शकतो, असे ते म्हणाले.
गोव्यातून जाणार असलेल्या तुकडीत केवळ पुरुष जवानांचा समावेश आहे. महिला जवानांना पाठविले जाणार नाही. निवडणुका होईपर्यंत तिथे राहावे लागणार आहे. त्रिपुरात १८ फेब्रुवारी रोजी तर मेघालयात २७ फेब्रुवारी रोजी निवडणुका होत आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल ३ मार्च रोजी होणार आहेत. गोव्यातील आयआरबी जवान त्या ठिकाणी निवडणुकीपर्यंत राहतील की निकालापर्यंत राहतील, याबद्दलही अद्याप काहीच गोवा पोलिसांना सांगण्यात आलेले नाही.
बुलेटप्रूफ जॅकेटस् नाहीत
आयआरबीच्या जवानांना त्रिपुरा आणि मेघालय यांसारख्या नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या प्रदेशात पाठवित असल्यामुळे त्यांना सुसज्ज पाठविणे हे पोलीस खात्याचे कर्तव्य ठरते. एटीएससह आयआरबीच्या जवानांसाठी बुलेटप्रूफ जॅकेट्स देण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात काहीच देण्यात आलेले नाही. बुलेटप्रूफ जॅकेट्सची फाईल अजून गृहखात्यात खितपत पडलेली आहे.