गोव्यात ८ हजार लोकांमागे १ बार; महाराष्ट्र, कर्नाटकला टाकले मागे, सुमारे २०० नाईट क्लब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 07:57 IST2025-12-31T07:57:32+5:302025-12-31T07:57:54+5:30
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात दर आठ हजार लोकांमागे एक मद्यविक्री बार आहे. मद्यविक्री दुकानांची संख्या प्रादेशिक लोकसंख्येपेक्षा खूप जास्त आहे.

गोव्यात ८ हजार लोकांमागे १ बार; महाराष्ट्र, कर्नाटकला टाकले मागे, सुमारे २०० नाईट क्लब
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात दर आठ हजार लोकांमागे एक मद्यविक्री बार आहे. ही संख्या फारच धक्कादायक आहे, अशी चिंता निवृत्त आयएएस अधिकारी अरविंद भाटीकर यांनी व्यक्त केली.
शेजारील महाराष्ट्र राज्यात एक लाखामागे एक तर कर्नाटकमध्ये दीड लाख लोकांमागे एक मद्य विक्री बार असल्याची स्थिती त्यांनी उघड केली. पर्वरी येथील थॉमस स्टीफन्स कोंकणी केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमावेळी डॉ. शुश्रुत मार्टिन्स स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला आर. बी. एस. कोमरपंत, अॅड. उदय भेंखें, पांडुरंग फळदेसाई व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोव्याच्या भवितव्याबाबत गंभीर चिंतन करण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. भाटीकर म्हणाले की, राज्यात सुमारे २०० नाईट क्लब कार्यरत असून त्यापैकी अनेक बेकायदेशीररीत्या चालत आहेत.
विशेष म्हणजे गोव्यात नाईट क्लब चालवण्यासाठी कोणतीही स्वतंत्र कायदेशीर तरतूदच नाही. मात्र तरीसुद्धा ते सुरू आहेत. गोवा सध्या गंभीर सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक आव्हानाचा सामना करत आहे. यात विशेष करून मद्यविक्री दुकानांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. गोव्यात मद्यविक्री दुकानांची संख्या प्रादेशिक लोकसंख्येपेक्षा खूप जास्त आहे. त्यातच भर म्हणजे अनियंत्रित नाईट क्लबमुळे समाजावर परिणाम होत आहे. आज गोव्यात दर ८ हजार नागरिकांमागे एक मद्यविक्री बार आहे हे खरेच धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
जनआंदोलनाची गरज!
भाटीकर म्हणाले की, 'गोव्याची नैतिकता, संस्कृती, सामाजिक, आर्थिक रचना संकटात सापडत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनआंदोलनाची नितांत गरज आहे. निवृत न्यायमूर्ती फेर्दिनो रिबेलो यांनी गोवा वाचवण्यासाठी लोक चळवळ उभारण्याची गरज व्यक्त केली आहे. त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. यात लोकांनीही सामील व्हावे. ते म्हणाले की, 'गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यापासून जनमत कौल, कोंकणी भाषा तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर गोमंतकीयांनी ज्या प्रकारे लढा दिला, त्याच धर्तीवर आता पुन्हा लोकआंदोलन उभे राहणे आवश्यक आहे.