लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पुन्हा भाजप प्रवेशाची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:42 IST2025-09-12T11:42:05+5:302025-09-12T11:42:54+5:30
माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपात पुन्हा प्रवेश करण्याचा मनोदय व्यक्त केला.

लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पुन्हा भाजप प्रवेशाची इच्छा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पक्षाकडून प्रस्ताव आल्यास भाजपात प्रवेश करण्यास आपण तयार असल्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म्हटले आहे. गेल्या निवडणुकीवेळी भाजपपासून फारकत घेतली असली तरी आपला मूळ पिंड भाजपचाच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपात पुन्हा प्रवेश करण्याचा मनोदय व्यक्त केला. कारण आपला मूळ पिंड हा भाजपचाच आहे. भाजपसाठी आपल्याला १२ वर्षे घरही सोडावे लागले होते, अशी भावनिक आठवणही त्यांनी सांगितली.
पार्सेकर म्हणाले की, माझे घर हे मगो समर्थक. त्यामुळे भाजपमध्ये गेल्यामुळे घरातील नात्यात दुरावा निर्माण झाला. १२ वर्षे घर सोडावे लागले होते. परंतु भाजपचा आमदार झाल्यानंतर पुन्हा घरात परत गेलो होतो. त्यामुळे दोन वर्षे भाजपपासून दूर राहून पुन्हा भाजपात परतणे आपल्याला कठीण नाही.'
ते म्हणाले की, 'मागील निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी आपल्याला पक्ष सोडावाच लागला. मी निवडणूक लढविली नसती तर राजकीयदृष्ट्या काळाच्या पडद्याआड गेलो असतो.'
पार्सेकर यांनी 'दलाली करणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे जमिनींचे दर भरमसाट वाढले आहेत आणि यासाठी दलाली करणारे लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत,' असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांनी कोणाचेही स्पष्ट नाव घेतले नाही. ते म्हणाले की, भविष्यात लोकांनी आपला उमेदवार निवडताना फार काळजीपूर्वक निवडण्याची गरज आहे. काही राजकारण्यांचा जमिनीवर डोळा असतो. लोकांनी त्यासाठी सतर्क असणे आवश्यक आहे'.