Goa Election 2022 : पंडित नेहरुंनी गोवा मुक्तिसाठी सैन्य पाठवण्यास नकार दिला होता : पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 20:40 IST2022-02-10T20:40:00+5:302022-02-10T20:40:45+5:30
काँग्रेसने नेहमीच गोमंतकीयांचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर केला : पंतप्रधान

Goa Election 2022 : पंडित नेहरुंनी गोवा मुक्तिसाठी सैन्य पाठवण्यास नकार दिला होता : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पणजी : "काँग्रेसला गोव्याची कधीही चिंता नव्हती. पंडित नेहरुंनी गोवा मुक्तिसाठी सैन्य पाठवण्यास नकार दिला होता. काँग्रेसने नेहमीच गोमंतकीयांचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर केला," अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हापसा येथील जाहीर सभेत केली. "गोवा स्वतंत्र व्हावा यासाठी येथे सत्याग्रही, स्वातंत्र्यसैनिक गोळ्या झेलत होते, पोर्तुगीजांचे अत्याचार सहन करत होते. मात्र त्यावेळी काँग्रेस सरकारने गोव्याला मदत केली नाही. लाल किल्ल्यावर भाषण करताना गोवा मुक्त करण्यासाठी सैन्य पाठवणार नाही, असे जाहीरपणे सांगितले," असेही मोदी यावेळी म्हणाले.
निवडणुकीच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान गुरुवारी गोव्यात दाखल झाले होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक व इतर नेते तसेच पक्षाचे उमेदवार उपस्थित होते.
सांगितला 'गोवा'चा अर्थ
"गोवा म्हणजे ‘जी फॉर गव्हर्नन्स, ओ फॉर ओपोर्च्युनिटी व ए फॉर अॅस्पिरेशन’ असे आम्ही मानतो. गोव्यातने गव्हर्नन्स अर्थात प्रशासनाच्या बाबतीत देशात आदर्श राज्य बनण्याचा मान मिळवला आहे," असे मोदींनी नमूद केले.
'लाँचिंग पॅड म्हणून पाहतायत'
काही राजकीय पक्ष गोव्याला लाँचिंग पॅड म्हणून पहात आहेत. या पक्षांना गोव्याबद्दल काहीही माहिती नाही. त्यांच्याकडे कोणतीही दूरदृष्टी किंवा अजेंडा नाही. या राजकीय पक्षांबद्दल गोमंतकीयांना आता बरेच काही कळून चुकले आहे. गोमंतकीयांची निवड शुद्ध आहे आणि गोवेकर भाजपच्याच पाठीशी असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
'भाजप कटिबद्ध'
"गोव्याच्या या भूमीत एकदा मी आलो असता अनपेक्षितपणे माझ्या मुखातून काँग्रेसमुक्त भारत असे उद्गार आले. आज संपूर्ण देशात अनेक नागरिक ‘काँग्रेसमुक्त भारत’चा ठराव घेत आहेत. लोकांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. डबल इंजिन सरकार नसते तर १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गोव्यात सफल झाले असते का? गोव्याचा पर्यटन व्यवसाय आज शंभर टक्के लसीकरणामुळेच बहरला आहे हे विसरुन चालणार नाही," असे मोदी यावेळी म्हणाले.