मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 07:41 IST2025-08-21T07:39:56+5:302025-08-21T07:41:26+5:30
पर्तगाळ मठाच्या ५५० व्या वर्धापनदिनाचे निमंत्रण

मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले!
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल, बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ मठाच्या ५५० व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना दिले.
या प्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत मठाचे अध्यक्ष तथा उद्योगपती श्रीनिवास धेंपो, मठाचे उपाध्यक्ष आर. आर. कामत उपस्थित होते. तेराव्या शतकात जगद्गुरू माधवाचार्य यांच्या द्वैत आदेशानुसार हा मठ स्थापन झाला होता. मठाच्या ५५० व्या वर्धापनदिनाच्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी मोदींना निमंत्रण देण्यात आले.
पुस्तक दिले भेट...
मुख्यमंत्र्यांनी मोदी यांना 'टेम्पल ऑफ गोवा - अ स्पिरिच्युअल ओडीसी' हे पुस्तक भेट दिले. मंगळुरुच्या वर्ल्ड कोंकणी सेंटरने प्रकाशित केलेले हे पुस्तक गोवा सरकारने पुनर्मुद्रित केले आहे. पोर्तुगीज काळात गोव्यातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त तसेच स्थलांतरित करण्यात आली. ही मंदिरे पुन्हा उभारण्यात आली असून ती लोकांच्या अढळ श्रद्धेची व लवचिकतेची साक्ष देणारी आहेत, याची माहिती वरील पुस्तकात आहे. पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे राज्य सरकारने पुन्हा उभारली आहेत. त्याचबरोबर अनेक ऐतिहासिक मंदिरांचा जीर्णोद्धारही केला आहे. मंदिरांच्या माध्यमातून गोव्याची पंरपरा पुन्हा जोपासली जात आहे.