गोवा केअर्स धोरणातून आरोग्य सेवा लोकांच्या दारी नेणार; विश्वजीत राणे यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:52 IST2025-09-12T11:51:31+5:302025-09-12T11:52:41+5:30
दोनापावला येथे 'हेल्थ टेक समीट-२०२५'मध्ये मांडले गोव्याचे आरोग्य मॉडेल, प्रत्येकाला दर्जेदार सुविधा देण्यावर असेल भर

गोवा केअर्स धोरणातून आरोग्य सेवा लोकांच्या दारी नेणार; विश्वजीत राणे यांची मोठी घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोवा केअर्स धोरण राबवून वैद्यकीय सेवा लोकांच्या दारी नेली जाईल, अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी गुरुवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनुसार गोव्याच्या आरोग्य सेवा क्षेत्रात आम्ही खूप बदल व सुधारणा करत आहोत. प्रत्येक गोमंतकीयाच्या दारापर्यंत आम्हाला वैद्यकीय सेवा न्यायची आहे आणि आम्ही ती नेऊ, असे राणे म्हणाले.
दोनापावला येथे झालेल्या हेल्थ टेक समीट-२०२५ मध्ये मंत्री राणे बोलत होते. लिडिंग विथ व्हीजन, हिलींग थ्रू इनोवेशन हे या परिषदेचे सूत्र होते. यावेळी राणे यांची प्रकट मुलाखत झाली. ते म्हणाले की गोव्याच्या वैद्यकीय क्षेत्रात अनेक आधुनिक सोयीसुविधा उभ्या राहत आहेत. आम्हाला नवीन कॅन्सर इस्पितळ मिळाले आहे. माता व मुल सेवा विभाग मिळाला आहे. गोव्याच्या आरोग्य मॉडेलची यशस्वीतता लोकांना पटली आहे. आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या व्हीजनप्रमाणे गोव्याचे आरोग्य मॉडेल राबवत आहोत. प्रत्येक लोकांच्या दारावर आरोग्य सेवा पोहचविणे हे ध्येय आहे. या मार्गात ज्या अडचणी आहेत, त्या दूर केल्या जात आहेत.
दर्जेदार वैद्यकीय सेवा देणे हेच लक्ष्य : मंत्री राणे
-मंत्री राणे म्हणाले की, स्टेट केअर हे नवे धोरण आरोग्य खाते लवकरच जाहीर करणार आहे. गोमंतकीय महिला, पुरुष, - मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याची - काळजी कशा पद्धतीने जलदगतीने - घेतली जाईल हे या धोरणातून कळून येईल.
- प्रत्येक सामान्य माणसाला चांगली व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळविण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आम्हाला समाजाचे आरोग्य सांभाळण्यासाठी काय करायला हवे याचा मार्ग दाखवला आहे, आम्ही त्यानुसार काम करत आहोत.