दामू नाईकांचे 'शक्तिप्रदर्शन'; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला, मंत्री-आमदारही झाले सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 11:17 IST2025-09-07T11:16:15+5:302025-09-07T11:17:20+5:30

२०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ५१ टक्के मते मिळवत २७ जागा जिंकण्याचा संकल्प केला व्यक्त

goa bjp state president damu naik show of power enthusiasm increased among the workers and ministers mla also became active | दामू नाईकांचे 'शक्तिप्रदर्शन'; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला, मंत्री-आमदारही झाले सक्रिय

दामू नाईकांचे 'शक्तिप्रदर्शन'; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला, मंत्री-आमदारही झाले सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा कालचा वाढदिवस म्हणजे झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शनच ठरले. दामू नाईक हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच असा थाटामाटात वाढदिवस झाला. हजारो भाजप कार्यकर्ते व समर्थक दामूंच्या वाढदिन सोहळ्यात सहभागी झाले.

दामू नाईक यांनी जाणीवपूर्वक शक्ती प्रदर्शन केल्याचे राजकीय क्षेत्रात मानले जात आहे. दामू नाईक यांच्यामुळे भंडारी समाजातील बहुसंख्य मते भविष्यात भाजपकडे वळू शकतील काय याचा कानोसा सध्या पक्षातील काही जबाबदार पदाधिकाऱ्यांचा गट घेत आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी एकदा भाजपला ५१ टक्के मते मिळाली होती. आता २०२७ च्या विधानसभा निवडणुकीवेळीही भाजपने ५१ टक्के मते मिळवायला हवीत. आम्ही सर्वजण एकत्र येऊन ती मते मिळवू शकू. २७ जागा आणि ५१ टक्के मतांची प्राप्ती हा माझा संकल्प आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल सांगितले. आपल्या वाढदिनी दामू नाईक हे कार्यकर्त्यांसमोर व भाजपच्या अनेक मंत्री, आमदारांच्या उपस्थितीत बोलले. 

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मंत्री नीळकंठ हळर्णकर, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, मंत्री माविन गुदिन्हो, आमदार प्रेमेंद्र शेट, प्रवीण आर्लेकर, दिव्या राणे, रुदोल्फ फर्नांडिस, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह अन्य आमदार, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्याही उपस्थित होत्या. दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष दामू हे धडाडीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला सत्तेबरोबरच मोठे मताधिक्यही मिळणार आहे.

डिचोली येथे केशव सेवा साधना संचालित नारायण झांट्ये विशेष मुलांच्या शाळेत दामू नाईक यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार सदानंद तानावडे, आरती बांदोडकर, प्रिया शेट, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, दया कारबोटकर तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते तसेच युवा कार्यकर्त्यां दामू नाईक यांना शुभेच्छा दिल्या. या स्वागताने दामू नाईक भारावून गेले.

गणपतीने माझे ऐकले आहे...

मडगाव येथे काल रात्री बोलताना दामू नाईक म्हणाले की, खूपच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थकांनी माझ्या वाढदिनी उपस्थिती लावली. अनंत चतुर्थदशीदिनी श्री गणपतीचे विसर्जन झाले. गणपतीने जाताना माझ्या सगळ्या प्रार्थना ऐकल्या आहेत. २०२७ साली पुन्हा एकदा गोव्यात भाजपला मोठा विजय मिळावा म्हणून मी प्रार्थना केली. आम्हा सर्वांना व सर्व कार्यकर्त्यांना चांगली बुद्धी दे असेही मी मागितले. कारण निवडणुकीवेळी काहीजणांची बुद्धी थोडा वेगळा विचार करत असते, तसे घडू नये म्हणून मी मागितले. सर्वांनी डोळ्यांसमोर भाजपचाच विचार करावा. गणपतीने आशीर्वाद दिला आहे, असे दामू म्हणाले.

एवढी वर्ष आपण घरातच वाढदिवस साजरा करत होतो. पण आता भाजप अध्यक्ष असल्याने या दिवसाला व्यापक स्वरूप आले आहे. सर्वांनाबरोबर घेऊन जाण्याचा मी निश्चिय केला आहे. पक्ष संघटन वाढीसाठी सर्वांना एकत्रित करणार आहे. त्यासाठी परमेश्वराने मला ताकद द्यावी, अशी प्रार्थना आपण रुद्रेश्वराच्या चरणी केली आहे. - दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

 

Web Title: goa bjp state president damu naik show of power enthusiasm increased among the workers and ministers mla also became active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.