गोवा : असंतुष्ट आमदाराला भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून अप्रत्यक्ष आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 13:05 IST2018-10-10T13:03:55+5:302018-10-10T13:05:13+5:30
भाजपाचे कळंगुटचे असंतुष्ट आमदार मायकल लोबो हे अलिकडे वारंवार पदाचा राजीनामा देण्याची भाषा करू लागल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आता प्रथमच लोबो यांना अप्रत्यक्षरित्या आव्हान दिले आहे.

गोवा : असंतुष्ट आमदाराला भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून अप्रत्यक्ष आव्हान
पणजी : भाजपाचे कळंगुटचे असंतुष्ट आमदार मायकल लोबो हे अलिकडे वारंवार पदाचा राजीनामा देण्याची भाषा करू लागल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आता प्रथमच लोबो यांना अप्रत्यक्षरित्या आव्हान दिले आहे. राजीनाम्याची भाषा करणा-यांनी शब्ददेखील पाळायला हवा, अन्यथा लोकांमधील विश्वास जातो, अशा शब्दांत तेंडुलकर यांनी लोबो यांच्या कानाला पकडले आहे.
प्रदेशाध्यक्षांनी जाहीरपणे भाजपाच्या एखाद्या असंतुष्ट आमदाराला फटकारण्याची घटना अलिकडे प्रथमच घडली आहे. लोबो हे गोवा विधानसभेचे उपसभापतीही आहेत. लोबो यांनी जाहीरपणे अलिकडेच भाजपाच्या दोन्ही खासदारांना शिंगावर घेतले. तसेच प्रशासन ठप्प झाल्याबाबत व सरकारी नोकर भरती अडून उरल्याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना जबाबदार धरले होते. गोव्यातील खनिज खाण प्रश्न सुटला नाही तर पद त्याग करू, असे विधान लोबो यांनी केलेले आहे. प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांना याविषयी पत्रकारांनी विचारले असता, तेंडुलकर यांनी लोबो यांची विधाने ही योग्य नव्हेत.
लोबो यांनी आपण राजीनामा देणार असल्याची भाषा यापूर्वीही केली होती. गोव्यात टॅक्सी व्यवसायिकांचा प्रश्न निर्माण झाला होता. टॅक्सी व्यवसायिकांनी काही महिन्यांपूर्वी आंदोलन केले होते. त्यावेळीही लोबो यांनी टॅक्सी व्यवसायिकांच्या समस्या नाही सुटल्या तर आपण पदाचा राजीनामा देईन असे म्हटले होते. प्रत्यक्षात टॅक्सी मालकांचे प्रश्न अजुनही सुटलेले नाहीत व लोबो यांनी राजीनामाही दिलेला नाही.
तेंडुलकर म्हणाले, की लोबो यांच्याविषयी भाजपामध्ये कुणालाच राग नाही. त्यांना मंत्रिपद मिळावे असे वाटते. त्यांच्यासारखेच अन्य भाजपा आमदारांनाही मंत्रिपद मिळावे अशी इच्छा असू शकते. लोबो यांच्याकडे मोठी क्षमता आहे. ते चांगले नेते आहेत पण त्यांनी प्रामाणिकपणे जर भाजपाचे काम सुरू ठेवले तर एक दिवस ते उच्च पदावर पोहोचतील. कदाचित ते भविष्यात मुख्यमंत्रीही होतील. त्यांनी राजीनाम्याच्या धमक्या देण्यापूर्वी विचार करावा. कारण विधाने करणे सोपे असते. त्याची अंमलबजावणी कठीण असते.