गोवा भाजपाला डिसेंबरमध्ये नवे अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 12:52 PM2019-08-21T12:52:42+5:302019-08-21T13:07:58+5:30

गोव्यातील भाजपाला येत्या डिसेंबर महिन्यात नवे अध्यक्ष प्राप्त होणार आहेत.

goa bjp new state President would be decided by December this year | गोवा भाजपाला डिसेंबरमध्ये नवे अध्यक्ष

गोवा भाजपाला डिसेंबरमध्ये नवे अध्यक्ष

Next
ठळक मुद्देगोव्यातील भाजपाला येत्या डिसेंबर महिन्यात नवे अध्यक्ष प्राप्त होणार आहेत. नवे प्रदेशाध्यक्ष निवडण्यापूर्वीची सगळी तयारी सध्या भाजपाच्या पातळीवर सुरू आहेसदस्य नोंदणी मोहीम पूर्ण झाल्यानंतर भाजपाची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.

पणजी - गोव्यातील भाजपाला येत्या डिसेंबर महिन्यात नवे अध्यक्ष प्राप्त होणार आहेत. नवे प्रदेशाध्यक्ष निवडण्यापूर्वीची सगळी तयारी सध्या भाजपाच्या पातळीवर सुरू आहे. सदस्य नोंदणी मोहीम पूर्ण झाल्यानंतर भाजपाची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.

भाजपाच्या सदस्य नोंदणी मोहिमेचे राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख शिवराजसिंग चौहान नुकतेच गोवा भेटीवर येऊन गेले. गोव्यात भाजपाला एकूण चार लाख सदस्य नोंदविण्याचे लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. मात्र काही आमदार व काही प्रमुख पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्ते सदस्य नोंदणी मोहीमेला अजून हवा तेवढा वेग देऊ शकलेले नाहीत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणीसाठी वेगवेगळे लक्ष्य भाजपने आमदारांना ठरवून दिले आहे. भाजपाचे काही कार्यकर्ते आपण गेली पंचवीस वर्षे भाजपाचे काम करत असल्याचे सांगतात, मग त्यांनी किमान नवे पंचवीस सदस्य नोंदवायला नको काय असा प्रश्न नुकताच भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ताळगाव येथे झालेल्या सभेवेळी प्रमुख कार्यकर्त्यांना विचारला. प्रत्येक गावात व प्रत्येक घरात चला आणि नवे सदस्य नोंदवा, अशी सूचना शिवराजसिंग चौहान यांनी गोवा भाजपाला केली आहे.

दरम्यान, भाजपाची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया येत्या महिन्यात सुरू होईल. प्राथमिक सदस्य नोंदवून झाल्यानंतर सक्रिय सदस्य नोंदविले जातील. सक्रिय सदस्यांनाच समितीवर स्थान असेल. बूथस्तरीय समित्या, मंडल समित्या, जिल्हा समित्या अशा विविध स्तरांवर भाजपाच्या निवडणुका होतील व डिसेंबरमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष निवडले जातील. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची मुदत संपलेली आहे. तथापि, नवे प्रदेशाध्यक्ष निवडीर्पयत सुत्रे तेंडुलकर यांच्याकडेच राहतील. सदस्य नोंदणी मोहीमेला वेग यावा म्हणून मुख्यमंत्री सावंत यांनीही भाजपाच्या प्रदेश शाखेला काही सल्ले दिले आहेत. सध्या सुमारे दोन लाख सदस्य नोंदणी झालेली असेल असा पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचा दावा आहे.

 

Web Title: goa bjp new state President would be decided by December this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.