गोव्यावर शोककळा; कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 07:43 IST2025-10-15T07:42:47+5:302025-10-15T07:43:57+5:30
रवी नाईक यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपचे मंत्री, आमदार इस्पितळात दाखल झाले.

गोव्यावर शोककळा; कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक यांचे काल, मंगळवारी रात्री १२.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. फोंडा येथील सावईकर इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवी नाईक यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपचे मंत्री, आमदार इस्पितळात दाखल झाले. यावेळी इस्पितळाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्तेही जमले होते.
दोन दिवसांपासून रवी नाईक हे आजारी होते. काल रात्री उशिरा त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने फोंडा येथील सावईकर इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण गोव्यावर शोककळा पसरली आहे. गोव्याच्या राजकारणात अनेक दशके सेवा करणारे ज्येष्ठ नेते रवी नाईक यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध खात्याचे मंत्री म्हणून महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यांनतर काँग्रेस व सध्या भाजपमध्ये ते कृषिमंत्री होते.यावेळी माजी मंत्री तथा आमदार गोविंद गावडे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित नाईक कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, रवी नाईक यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज, बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी ठेवले जाणार आहे.
आमचे ज्येष्ठ नेते कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनाने खूप दुःख झाले. गोव्याच्या राजकारणातील दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री आणि विविध महत्त्वाच्या खात्यांच्या माध्यमातून दशकांपासून ज्यांनी गोमंतकीयांची सेवा बजावली अशा कणखर नेतृत्वाला आम्ही मुकलो आहोत. त्यांचे नेतृत्व, नम्रता आणि सार्वजनिक कल्याणातील योगदान नेहमीच लक्षात राहील. मी मनापासून श्रद्धांजली वाहतो. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री