समुद्रापलीकडचा गोवा पर्यटकांपर्यंत पोहोचवला: पर्यटन मंत्री रोहन खंवटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:16 IST2025-09-28T13:15:41+5:302025-09-28T13:16:29+5:30
बांबोळी येथे जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम : ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून तळागाळातील महिला स्वावलंबी बनल्या

समुद्रापलीकडचा गोवा पर्यटकांपर्यंत पोहोचवला: पर्यटन मंत्री रोहन खंवटे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : समुद्रापलीकडचा गोवा पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन खात्याने गेल्या काही वर्षात यशस्वी प्रयत्न केला आहे. याच माध्यमातून नवीन धोरणे राबविण्यासदेखील मदत झाली. होम स्टे, ग्रामीण पर्यटन, साहसी पर्यटन, वेलनेस यासारख्या पर्यटनाच्या अनेक पैलूंवर भर देत दर्जेदार पर्यटक राज्यात आणण्यात आले. एवढेच नव्हे तर होम स्टे, धार्मिक पर्यटन, ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून तळागाळातील महिलांना स्वावलंबी होण्यास मदत झाली, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी केले.
बांबोळी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने मंत्री रोहन खंवटे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक, व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, टीटीएजी अध्यक्ष जॅक सुखिजा व इतर मान्यवर उपस्थित होते.
'समुद्रापलीकडचा गोवा' या संकल्पनेमुळे राज्यात केवळ दर्जेदार पर्यटकच आले नाही तर त्यांनी येथे दीर्घकाळ घालवत समुद्र वगळता अनेक नवीन ठिकाणे एक्सप्लोर केली. पूर्वी असे होत नव्हते, केवळ समुद्रकिनाऱ्यांना भेट देत पर्यटक निघून जायचे, पण आता नवे उद्योजकांनी पुढाकार घेत गोवा घडविला.
यातून राज्याची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यटनाशी संबंधित जे विषय अडथळे बनत होते खासकरून टॅक्सी, कचऱ्याचा प्रश्न योग्य प्रकारे हाताळला व अडथळे दूर केले, असे खंवटे यांनी यावेळी सांगितले.
आवश्यक साधनसुविधेवर भर
राज्य सरकारसोबत केंद्र सरकारदेखील आम्हाला आधुनिक साधनसुविधा उभारण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. आत्तापर्यंत अनेक प्रभावी धोरणे आम्ही राबविली. आता येणाऱ्या काळात युनिटी मॉल, छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय, टाऊन स्क्वेअर, स्वदेश दर्शन यासारखे प्रकल्प येणार आहेत. यातून राज्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये अधिक भर पडणार आहे. यानिमित्ताने नवे पर्यटकही राज्यात येणार आहेत. आम्ही हे समजून घेतले पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून साकार होणारा विकसित भारत हे ट्रेड, टेक्नोलॉजी आणि टुरिझम यावर अवलंबून आहे. आम्ही पर्यटन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यात हातभार लावत आहे, असे खंवटे यांनी सांगितले.
इन्फ्लुएन्सरच्या विषयामागील हेतू पाहणे आवश्यक
अनेक इन्फ्लुएन्सर गोव्याचे नाव खराब करताना दिसत आहे. मुळात ते गोव्याची तुलना थेट इतर देशासोबत करतात. जे खरोखरंच मुद्दे आहेत ते आम्हालाही ठाऊक आहे आणि त्यावर आम्ही कामही करत आहोत. पण जे मुद्दे मुद्दामहून काढण्यात येत आहे त्यामागे त्यांचा हेतू काय ? त्यांना कुणी सांगितले हे जाणून घेणे आवश्यक आहे, असेही खंवटे यांनी यावेळी सांगितले.