Goa : गोव्यात ६० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या जागेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 22:58 IST2021-04-05T22:58:29+5:302021-04-05T22:58:54+5:30
Goa : राज्यात एकूण १,२६२ अंगणवाडी आहेत. यातील ७४० अंगणवाडी भाड्याच्या जागेत आहेत.

Goa : गोव्यात ६० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या जागेत!
पणजी : गोव्यात ६० टक्के अंगणवाड्या खाजगी इमारतींमध्ये भाड्याच्या जागेत कार्यरत असून वषार्काठी तब्बल १ कोटी ६७ लाख रुपये सरकार भाड्यापोटी बाहेर काढत आहे.
या अंगणवाड्यांची तर दुर्दशा झालेली आहेच, शिवाय सरकारी जागेत कार्यरत असलेल्या अन्य ५२२ अंगणवाड्यांनाही कोणीच वाली राहिलेला नाही. पायाभूत सुविधांच्या बाबतीत तीन-तेरा झाले आहेत.
अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी अलीकडेच विधानसभेत त्यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला मिळालेल्या लेखी उत्तरातून माहिती पुढे आली आहे, ती अशी की, राज्यात एकूण १,२६२ अंगणवाडी आहेत. यातील ७४० अंगणवाडी भाड्याच्या जागेत आहेत.
गेल्या नऊ वर्षांच्या काळात फक्त पाच नव्या अंगणवाडींचे काम हाती घेण्यात आले आणि तेही अजून पूर्ण होऊ शकलेले नाही. या बांधकामांवर ५० लाख रुपये खर्च करण्यात आले.
स्वयंपाकघर, प्रसाधनगृहे,स्टोअर रूम आदींनी अंगणवाडी सुसज्ज असाव्यात यासाठी सरकारने पावले उचलल्याचे मागे महिला बालकल्याणमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. परंतु या सर्व गोष्टी फक्त कागदावरच राहिलेल्या आहेत.
अंगणवाडीमध्ये अगदीच लहान मुले येत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा असायला हव्यात. धान्यसांठा ठेवण्यासाठी अंगणवाडीमध्ये स्टोअर रूमची आवश्यकता असते. अनेक अंगणवाड्यांमध्ये ही सोय अजूनही झालेली नाही.