गृहखाते रवी नाईक यांच्याकडे द्या : विजय सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 07:34 IST2025-08-23T07:34:02+5:302025-08-23T07:34:28+5:30
भोळशे सर्कलमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आमदार सरदेसाई यांनी पाहणी केली.

गृहखाते रवी नाईक यांच्याकडे द्या : विजय सरदेसाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. मुख्यमंत्री अनेक खाती स्वतःकडे ठेवून स्वतःवर जास्त ताण घेत आहेत. त्यामुळे गृहखाते रवी नाईक यांच्याकडे द्यावे, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.
भोळशे सर्कलमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची शुक्रवारी आमदार सरदेसाई यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे कोलमडली आहे. मुख्यमंत्री अनेक खात्यांचे काम करतात.
नव्याने शपथ घेतलेले मंत्री दिगंबर कामत यांनी ते मुख्यमंत्री असताना गृह आणि सार्वजनिक बांधकाम खाते स्वतःकडे ठेवले नसल्याचे सांगितले. त्यांचे हे विधान एक अप्रत्यक्ष सूचना आहे, ज्याचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. रवी नाईक यांनी गृहमंत्री असताना उत्तम काम केले आहे. ते आता गृहमंत्री असणे आवश्यक आहे.
लोकांनी शिस्त पाळावी
नव्याने बसवण्यात आलेले हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची नोंद ठेवतील. लोकांनी शिस्त पाळली पाहिजे. मला फातोर्डा विकसित करायचा आहे आणि तो प्रगतिशील करायचा आहे. फातोर्डा मतदारसंघातील पार्किंगची समस्या लवकरच सोडवली जाईल. रस्त्याच्या कडेला पार्किंग करू नये. कारण, रस्ते रुंद करण्याचा मुख्य हेतू वाहतूक सुरळीत ठेवणे आहे, रस्त्यावर वाहने पार्क करण्यासाठी जागा निर्माण करणे नव्हे, असे सरदेसाई म्हणाले.