गोमंतकीय कलाकारांना मराठी चित्रपटांत स्थान द्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 08:18 IST2025-08-10T08:17:19+5:302025-08-10T08:18:36+5:30
राज्यात जी नाट्यगृहे आहेत, त्यांचे रूपांतर थिएटरमध्ये करून तेथे मराठी चित्रपट दाखवता येतील.

गोमंतकीय कलाकारांना मराठी चित्रपटांत स्थान द्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'गोवा सरकार कोकणी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटांना अनुदान देत असते. जर कोणताही निर्माता, दिग्दर्शक ३० टक्के गोमंतकीय कलाकारांना घेऊन चित्रपट निर्मिती करत असेल तर त्यांना अनुदानही मिळू शकते. त्यामुळे गोमंतकीय कलाकारांना संधी द्या', असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'गोव्यात असंख्य कलाकार आहेत. त्यांना संधी मिळावी आणि चित्रपटनिर्मिती सुलभ व्हावी यासाठी आम्ही गोवा मनोरंजन संस्थेतर्फे एक खिडकी योजना लागू केली आहे. त्याचा लाभ चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांनी घ्यावा. राज्यात अधिकाधिक मराठी चित्रपट दाखवले जावेत, यासाठी विन्सन वर्ल्डसारख्या संस्थांनी प्रयत्न करावा. राज्यात जी नाट्यगृहे आहेत, त्यांचे रूपांतर थिएटरमध्ये करून तेथे मराठी चित्रपट दाखवता येतील.
दरम्यान, प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, रोहिणी हटंगडी, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, सई मांजरेकर, अजिंक्य देव, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, छाया कदम, किशोर कदम, जितेंद्र जोशी, गजेंद्र अहिरे, वैभव मांगले, भूषण प्रथान, गौरी इंगवले, राजेश्वरी सचदेव, शिवाली परब, नंदिनी चिकटे, अशोक समर्थ, शीतल समर्थ, पार्थ भालेराव, रोहित माने आदी नामवंत कलाकार येथे आले आहेत.
'कर्ज', 'एक कप च्या' होणार प्रदर्शित
महोत्सव आयनॉक्स चित्रपगृह आणि मॅक्चिनेझ पॅलेसमध्ये असून २० हून अधिक चित्रपट सादर होतील. गोमंतकीय निर्माते शर्व शेट्ये यांचा 'कर्ज' हा हिंदी लघुपट व किशोर अर्जुन यांनी निर्माण केलेला 'एक कप च्या' हा कोंकणी लघुपट प्रदर्शित केला जाईल.
आगाशे यांना 'कृतज्ञता सन्मान'
विन्सन वर्ल्डच्यावतीने येथील आयनॉक्स चित्रगृह आणि मॅक्विनेझ पॅलेसमध्ये आयोजित गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा, आमदार डिलायला लोबो, महापौर रोहित मोन्सरात, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, दिग्दर्शक महेश मांजरेकर, विन्सन वर्ल्डचे संचालक संजय शेट्ये, श्रीपाद शेट्ये, आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'कृतज्ञता सन्मान' प्रदान करण्यात आला.
मी मूळ गोमंतकीयच: प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, 'जरी महाराष्ट्रात राहिलो, चित्रपट केले तरी मी मूळ गोमंतकीय आहे. मांद्रे गावात माझी कुलदेवता आहे. गोव्याचे माझे नाते खूप जुने आहे. गोव्यात आलो की घरी आल्यासारखे वाटते.'