नवे चेहरेच घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 07:22 IST2025-11-14T07:22:00+5:302025-11-14T07:22:00+5:30
गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुका येत्या १३ डिसेंबर रोजी होतील.

नवे चेहरेच घ्या...
गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुका येत्या १३ डिसेंबर रोजी होतील. या निवडणुकीसाठी मतदान १३ रोजी नको, असा सूर काहीजणांनी लावला होता. निवडणुका पुढे ढकलल्या तर बरे होईल, असे काही राजकारणी बोलत होते. मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ठाम भूमिका घेतली. यापूर्वी ठरल्यानुसार झेडपी निवडणूक १३ रोजीच होईल, असे मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले आहे. वास्तविक एसआयआरचे (स्पेशल इन्टेन्सिव्ह रिविजन) काम जरी राज्यात सुरू असले, तरी झेडपी निवडणुका रोखण्याचे कारण नाही. मतदारयाद्या अपडेट करणे किंवा एसआयआरचे काम करणे ही प्रक्रिया सुरूच ठेवावी, पण त्याचबरोबर झेडपी निवडणूक एकदाची होऊन जाऊ द्या.
मुख्यमंत्री सावंत यांची भूमिका योग्य आहे. भाजपने उमेदवार निवडीसाठी कालपासून प्रक्रिया सुरू केली. उत्तर गोव्यासाठी बहुतेक झेडपी मतदारसंघात भाजपचे उमेदवार तसे ठरलेलेच आहेत. यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपची भूमिका आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पूर्वीच भूमिका मांडली होती की, पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी. गेली अनेक वर्षे भाजपसाठी ज्या कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्या, घाम गाळला, त्यांची कदर व्हायला हवी. दामू नाईक अशा कार्यकर्त्यांची कदर करणारे नेते आहेत. कारण दामूदेखील स्वतः अशा तळागाळातील पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांमधूनच पुढे आले आहेत.
यावेळी भाजपकडून ८० टक्के नवे चेहरे रिंगणात उतरविले जातील असे दिसते. काल म्हापशात जी बैठक झाली, त्यावेळी झालेल्या चर्चेचा सूरदेखील तसाच होता. उमेदवार निवडीसाठी भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते काल म्हापशात एकत्र बसले होते. कार्यकर्त्यांची पक्षनिष्ठा, आमदारांचा कल, कार्यकर्त्यांचा लोकसंपर्क, संघटनात्मक कामातील योगदान हे सगळे पाहून झेडपीसाठी उमेदवार निश्चित केले जात आहेत. भाजपमध्ये अशी प्रक्रिया प्रामाणिकपणे पार पाडली जाते. काँग्रेस पक्ष याबाबतच कमी पडत आहे.
काँग्रेसमध्ये प्रत्येक नेता आपल्याला जवळ कोण आहे, याचा विचार अगोदर करतो आणि मग त्या जवळच्या कार्यकर्त्याला तिकीट दिले जाते. जिंकण्याचा निकषदेखील नीट लावला जात नाही. जो जिंकून येण्याची क्षमता ठेवतो, त्याच्यावर काँग्रेसमध्ये अन्याय होत असतो. या उलट भाजपमध्ये विनेबिलिटी प्रथम पाहिली जाते. पक्षनिष्ठा हवीच, पण केवळ निष्ठेच्या होडीत बसून किनारा गाठता येत नाही. नदी पार करण्यासाठी जिंकण्याचीही क्षमता असावी लागते. उत्तर गोव्याप्रमाणेच दक्षिण गोव्यातही भाजपकडून चाचपणी सरू आहे.
भाजपकडून दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी झेडपी उमेदवार आज कदाचित निश्चित केले जातील. काल उत्तर गोव्यासाठी भाजप नेत्यांची बैठक झाली, तशी आज दक्षिण गोव्यासाठी होणार आहे. अशा प्रकारची गंभीर प्रक्रिया एकेकाळी काँग्रेस पक्षात होत होती, पण गेली पंधरा वर्षे काँग्रेस ढेपाळला आहे. विरोधात बसावे लागल्यानंतर तर काँग्रेसचे बळ आणखी कमी झाले. झेडपीसाठी उमेदवार निवडताना काँग्रेसची दमछाक होणार आहे. काँग्रेस व आप यांच्यात झेडपीसाठी युती होऊ शकत नाही. ते पक्ष एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करतील व त्यात भाजप लाभ उठविण्याचा प्रयत्न करील. यावेळी झेडपी निवडणुकीत आरजीची शक्तीदेखील किती आहे ते जनतेला कदाचित कळून येईल.
बार्देश, सासष्टी, पेडणे, डिचोली अशा तालुक्यांत आरजी धडपड करत आहे. आरजीचे उमेदवार केवळ गोंयकारपणाच्या मुद्द्यावर झेडपी निवडणूक जिंकू शकतील का, हे पाहावे लागेल. भाजपची उमेदवार यादी जाहीर होईल तेव्हा त्यात किती नवे चेहरे आहेत हे कळून येईलच. पूर्वी भाजपतर्फे जे दोन-तीनवेळा लढले व झेडपी सदस्य झाले त्यांना बदलण्याची गरज आहेच. आपण एक-दोनवेळा निवडून आलो की काहीजणांना वाटते की झेडपीचे सदस्यपद आता आपल्याकडे कायमच राहायला हवे. सरकारने आपला मतदारसंघ कधीच आरक्षित करू नये, असेही अनेकांना वाटत असते. काहीजणांना तर वाटते की आपण आता आमदार व्हायला हवे.
अर्थात असे वाटणे गैर नाही, पण झेडपी सदस्य काम किती करतात? अवघेच झेडपी सदस्य खूप कष्ट घेऊन विकासकामे करून देत असतात. सर्वांना ते जमत नाही. जे झेडपी सदस्य खरोखर लोकांच्या कल्याणासाठी झटतात, ते मात्र भविष्यात आमदार होतातच. भाजपने झेडपी निवडणुकीच्या रिंगणात नव्या रक्ताला संधी दिली तर लोकांनाही ते आवडेल.