नोकरी मिळाली, जबाबदारीचे भान ठेवा; मुख्यमंत्र्यांचा नवोदितांना सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:15 IST2026-01-09T14:13:09+5:302026-01-09T14:15:25+5:30

कर्मचारी निवड आयोगामार्फत निवड झालेल्या ९५ उमेदवारांना नियुक्तिपत्रे प्रदान

get a job be aware of your responsibilities cm pramod sawant advice to newcomers | नोकरी मिळाली, जबाबदारीचे भान ठेवा; मुख्यमंत्र्यांचा नवोदितांना सल्ला 

नोकरी मिळाली, जबाबदारीचे भान ठेवा; मुख्यमंत्र्यांचा नवोदितांना सल्ला 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'सरकारी सेवेत असताना कोणत्याही प्रकारच्या बाह्य लाभ, आमिष किंवा दबावाला बळी पडू नका. नोकरी मिळाली, आता जबाबदारीने काम करा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल,' असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. कर्मचारी निवड आयोगामार्फत निवड झालेल्या ९५ उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वितरण केल्यानंतर ते बोलत होते.

आरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वीज खात्यातील विविध तांत्रिक पदांसाठी या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. आयोगामार्फत भरती करण्यात आलेली पहिली तांत्रिक बॅच आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, निवड झालेल्या उमेदवारांचे कुटुंबीय आणि मान्यवर उपस्थित होते.

पारदर्शक भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना संधी देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरूच राहील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी आपल्या मागील कार्यकाळातील अनुभव सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'काही तरुणांना लहान वयात चांगली सरकारी नोकरी मिळाल्यानंतर पदाचा गैरवापर घेतला जातो, चुका केल्या जातात आणि नंतर त्यांच्या पालकांना माफी मागण्यासाठी माझ्याकडे यावे लागले. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये.

सरकारी नोकरी केवळ अधिकार नव्हे तर मोठी जबाबदारीही देते. त्यामुळे नोकरी मिळाल्यावर प्रामाणिकपणे, नियमांचे पालन करून जनतेसाठी काम आवश्यक आहे. चुकीचे वर्तन, गैरप्रकार, निष्काळजीपणा सहन करणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई होईल,' असे मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वोच्च सेवेचे लक्ष्य ठेवा

सावंत यांनी गोव्यातील युवकांना मोठी स्वप्ने पाहा आणि आयएएस-आयपीएससारख्या सर्वोच्च सेवा देणारे अधिकारी बनण्याचे लक्ष्य ठेवा, असे आवाहन केले.

ते म्हणाले की, 'तरुणांनी शिस्त, नैतिकता आणि जबाबदारी या मूल्यांचा अवलंब करून प्रशासनात विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे.

नोकरी गुणवत्तेच्या आधारेच

नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'गुणवत्तेच्या आधारे नोकरी मिळणे ही गोव्याच्या प्रशासकीय व्यवस्थेतील सकारात्मक बाब आहे.

युवकांनी केवळ शासकीय नोकरीपुरते मर्यादित न राहता गोवा लोकसेवा आयोग तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याचे ध्येय ठेवावे.

आमिषांना बळी पडू नका

मुख्यमंत्री म्हणाले की,' कर्मचारी निवड आयोगामार्फत पारदर्शक पध्दतीने व गुणवत्तेवर निवड झालेली आहे हे इतरांनाही सांगा. कोणी जर पैसे मागून वगैरे नोकग्रा देण्याचे आमिष दाखवत असेल तर त्यांना बळी पडू नका. अशा 'चिंदी चोरां'ना ठेचून काढण्याची गरज आहे.

२० अधिकारी निलंबित

गैरवर्तन प्रकरणी आतापर्यंत सुमारे २० सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती देत मुख्यमंत्री म्हणाले की, अधिकारी केवळ सरकारी नोकर नसून ते जनतेचे सेवक आहेत.

कर्मचारी निवड आयोगाला अधिक सक्षम आणि बळकट केले असून, शासकीय सेवांतील भरती प्रक्रिया पारदर्शक, कार्यक्षम आणि कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सुधारणा केल्या आहेत. चांगले प्रशासन आणि गुणवत्ताधिष्ठित निवड हीच सरकारची भूमिका आहे.
 

 

Web Title : नौकरी मिली: जिम्मेदारी निभाएं, मुख्यमंत्री की नई भर्तियों को सलाह

Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने नए सरकारी कर्मचारियों को भ्रष्टाचार और लापरवाही के खिलाफ चेतावनी दी। उन्होंने ईमानदारी, नियमों का पालन और जन सेवा पर जोर दिया। सावंत ने युवाओं से आईएएस और आईपीएस जैसे शीर्ष सिविल सेवा पदों के लिए लक्ष्य रखने का आग्रह किया, योग्यता आधारित चयन और पारदर्शिता पर प्रकाश डाला। उन्होंने रिश्वतखोरी का शिकार होने के खिलाफ भी चेतावनी दी।

Web Title : Job Granted: Uphold Responsibility, Chief Minister Advises New Recruits

Web Summary : Chief Minister Pramod Sawant cautioned new government employees against corruption and negligence. He emphasized integrity, adherence to rules, and public service. Sawant urged youth to aim for top civil service positions like IAS and IPS, highlighting merit-based selection and transparency. He also warned against falling prey to bribery.