अस्सल गोंयकार पात्रांव! बहुजन समाजाचा, हवाहवासा वाटणारा नेता रवी नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 07:21 IST2025-10-16T07:19:27+5:302025-10-16T07:21:00+5:30
गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण होऊ नये म्हणूनही आपण चळवळीत भाग घेतला होता, असे रवी अभिमानाने सांगायचे.

अस्सल गोंयकार पात्रांव! बहुजन समाजाचा, हवाहवासा वाटणारा नेता रवी नाईक
बहुजन समाजाला आपला आणि हवाहवासा वाटलेला नेता म्हणजे रवी नाईक. हिंदू बहुजन समाजासाठी रवी आधार ठरले होते. 'पात्रांव आमचो' ही भावना तळागाळातील लोकांमध्येही होती. तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ गोव्याच्या राजकारणात रवी नाईक नाव चर्चेत राहिले. सामान्य कुटुंबातून आलेला माणूस केवढी मोठी झेप घेऊ शकतो हे रवी यांनी दाखवून दिले. शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, वाढवल्या. स्वतःचा हॉटेल व्यवसाय उभा करून अनेकांना रोजगार उपलब्ध केला. कुणाचा वाढदिवस असो, विवाह असो किंवा मृत्यूचा प्रसंग असो, रवी नाईक भेटीसाठी जायचेच. यामुळे लोकांना रवींविषयी आपुलकी होती.
दोन वेळा निवडणुकीत हरूनदेखील त्यांचे महत्त्व कधी कमी झाले नाही. गावातल्या माणसाची भाषा रवी ओळखायचे. ग्रामीण गोव्यात फिरल्याने व भंडारी समाजात जन्म झाल्याने रवींना गरीब माणसाचे दुःख कळायचे. १९९१ साली रवी मुख्यमंत्री झाले. त्यांनी गुंडांना धडा शिकवला. तथाकथित गोवा प्रोटेक्टर संघटनेलाही वठणीवर आणले. कूळ मुंडकारांसाठी आपण लढलो होतो, गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण होऊ नये म्हणूनही आपण चळवळीत भाग घेतला होता, असे रवी अभिमानाने सांगायचे.
रवी यांची स्वतःची अशी एक शैली होती. त्या शैलीत अस्सल गोंयकारपण होते. सायंकाळी मस्त कडक चहा प्यायचा, सोबत सामोसा खायचा, असा सल्ला मीडियाशी गप्पा करताना ते द्यायचे. चाय पिया, सामोसा खाया अशा प्रकारचे विनोद रवींच्या अशाच स्वभावातून निर्माण झाले. सर्दी झाली की थोडी फेणी प्यायची, असे त्यांनी सांगताच लोकांत हशा पिकायचा. आपण कॅमेऱ्यासमोर बोलतोय वगैरे विचार रवी करत नसत. त्यांचे वागणे नैसर्गिक होते. त्यात नाटकीपणा नव्हता. मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी अनेक वर्षे त्यांचे तीव्र राजकीय मतभेद होते; पण सुदिनविषयी बोलतानादेखील ते विनोदी शैलीत बोलायचे. आपल्या विरोधकालादेखील जास्त जखमी करायचे नाही किंवा कायमचा शत्रू करायचे नाही, हे पात्रांवच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच कोणत्याही वयाची व्यक्ती रवींशी मैत्रीने जोडली जायची.
एकेकाळचे ते खेळाडू, नंतर मगो पक्षाच्या युवा शाखेत आले. पुढे मगोपचे नेते झाले. त्यांनी विष्णू वाघ यांच्यासारख्या लढवय्या वक्त्याला एकेकाळी सोबत ठेवले होते. रवी जेव्हा उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूक लढवून दिल्लीत पोहोचले, तेव्हा वाघ यांनी रवींचा प्रचार केला होता. पुढील काळात म्हणजे २००५ सालानंतर गोविंद गावडे हे रवींचे पट्टशिष्य बनले. रवी कधी तरी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री बनतील असे कुणालाच वाटले नव्हते; पण ते उपमुख्यमंत्री झाले होते. आपल्यामुळेच पर्रीकर त्यावेळी सीएम होऊ शकले असे रवी अनेकदा सांगायचे. रवींना मीडियाशी चांगले संबंध ठेवणे, पत्रकारांशी मनसोक्त गप्पा करणे आवडायचे. रवी खवय्ये होते. एखाद्या हॉटेलमध्ये चांगले पदार्थ मिळतात असे कुणाकडूनही कळले तर रवी त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचे. पणजीतील जुन्या (आता बंद पडलेले) मांडवी हॉटेलमधले अस्सल गोमंतकीय जेवण त्यांना आवडायचे. आपल्यासोबत ते इतरांनाही खाऊ घालायचे. पावात शिरा घालून कसा खायचा किंवा चहासोबत कांदा-भजी कशी खायची, याचे किस्से रवी आपल्या खास मित्रांना सांगायचे. सुंगटाचे हुमण किंवा चिकन शागुती हे रवींचे आवडीचे विषय. रवींची पत्रकार परिषददेखील खेळीमेळीत व्हायची.
विरोधी पक्षनेतेपदी असताना रवी त्यावेळच्या भाजप सरकारविरुद्ध बेधडक बोलायचे. पोर्तुगीज काळात गोवा कसा होता वगैरे अनुभव रवी अनेकदा मीडियाला सांगायचे. रवी हे आगळेवेगळे होते. त्यांनी अनेक दिग्गज राजकारणी पाहिले, अनुभवले. त्यांच्यासोबत काम केले. मात्र रमाकांत खलप, दयानंद नार्वेकर अशा सर्व राजकारण्यांच्या पुढे रवी पोहोचले. राजकीय संकटाची चाहुल रवींना इतरांपेक्षा लवकर लागायची.
रवी राजकारणात टिकले, कारण ते कंजुष नव्हते. लोकसंपर्कही अफाट व संघटन कौशल्यही मजबूत. चेहऱ्यावर कायम हास्य. ओठावर शब्दांची मिठास. त्यांच्या स्वभावात अतिआक्रमकपणा नसल्याने ते भाजपमध्येही मिसळले. फोंड्यातील मुस्लीम मतदारांशी त्यांनी जाणीवपूर्वक कायम चांगले संबंध ठेवले. मडगावमध्ये जसे दिगंबर कामत तसे फोंड्यात रवी. त्यामुळे काँग्रेसचे तिकीट असो किंवा भाजपचे तिकीट असो, रवी निवडून यायचेच. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.