गॅसचे वांदे; लोक रांगेत, हॉटेल उद्योग अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:19 IST2026-03-13T09:18:59+5:302026-03-13T09:19:43+5:30
घरगुती सिलिंडरचा पुरेसा साठा असल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

गॅसचे वांदे; लोक रांगेत, हॉटेल उद्योग अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे राज्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण बंद आहे. तशाच पद्धतीने घरगुती सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याची भीती असल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गॅस एजन्स व वितरण केंद्रांसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या.
गुरुवारी या परिस्थितीत अधिकच भर पडली. पेडणेपासून काणकोणपर्यंत राज्यभर ठिकठिकाणी सिलिंडर मिळविण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्याचा फटका बहुतांश हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायाला बसला आहे. दरम्यान, राज्यात घरगुती स्वयंपाक गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही. मात्र, व्यावसायिक पुरवठ्यावर परिणाम झाला असून केंद्र आणि राज्य सरकार यावर तोडगा काढत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.
राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीला नागरी पुरवठा सचिव संजीव गडकर, के. आर चौरासिया, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी अॅग्ना क्लिट्स, नागरी पुरवठा संचालक जयंत तारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे घरगुती ग्राहकांना सुरळीत गॅस सिलिंडर वितरण करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांनी तेल कंपन्यांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश देण्यात आले.
एलपीजी साठेबाजी रोखण्यासाठी जनतेला जागरूक करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुख्य सचिव आणि इतर सदस्यांना गॅस सिलिंडर साठ्यात तसेच पुरवठा आणि सिलिंडर पुरवठा कमी होऊ नये म्हणून केलेल्या उपायांची माहिती देण्यात आली.
तेल कंपन्यांसमवेतच्या बैठकीत एलपीजी सिलिंडर पुरवठ्यासंबंधी लोकांमध्ये भीती कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेऊन लोकांना खऱ्या परिस्थितीची माहिती देण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभा अधिवेशनात सरकारवर टीका केली. देशातील इतर राज्ये एलपीजीचा तुटवडा भासू नये म्हणून खबरदारी घेत असताना राज्य सरकार युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
राज्यात स्वयंपाक गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही. फक्त व्यावसायिक पुरवठ्यावर परिणाम झाला असून केंद्र आणि राज्य सरकार यावर तोडगा काढत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमधील गॅस पुरवठ्याबाबत सरकार उपाययोजना करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील तेल कंपन्यांशी मुख्य सचिवांनी केली चर्चा
मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांनी गुरुवारी आयओसीएल, एचपीसीएल आणि बीपीसीएल या तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींसह राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यातील एलपीजी सिलिंडर पुरवठ्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील एकूण परिस्थिती चांगली आहे. एलपीजी सिलिंडर साठा भरपूर असल्याने घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले.