गरबा-रास आणि अज्ञानातील दांडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 09:34 IST2025-10-23T09:33:47+5:302025-10-23T09:34:14+5:30

नवरात्रात देवीची पूजा तर होतेच पण गरबा रास किंवा रास-गरब्याची धूम काही वेगळीच अनुभवायला मिळते.

garba raas and the unknown dandiya | गरबा-रास आणि अज्ञानातील दांडिया

गरबा-रास आणि अज्ञानातील दांडिया

गोपाळ शेट्ये, पेडणे

साधारण १९८५ च्या दिवाळीच्या आसपास दमण या ठिकाणी नवीन अग्निशमन दलाची स्थापना झाली आणि त्याचवेळी माझी नियुक्तीसुद्धा तिथे झाली. नवीन भूमी, नवा प्रदेश. भाषा-आचार-विचार, सण-समारंभसुद्धा अगदी गुजराथी संस्कृतीचे. हळूहळू दिवस पुढे जात होते, परिसरातील लोकांशी संपर्क वाढत होता. सुदैव म्हणजे आम्ही त्या प्रदेशात नवखे असलो तरी आमच्या सोबत गोव्यात प्रशिक्षित झालेले आणि काही वर्ष गोव्यातच सेवा दिलेले मूळ दमणचे काही जवान सोबत होते. त्यामुळे गुजराथमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने साजरा होणारा नवरात्र उत्सव दुसऱ्या वर्षी जवळच्या एका खेडेगावात जाऊन बघता
आला. स्थानिक लोकांकडून त्याविषयी अधिक जाणून घेता आले.

नवरात्रात देवीची पूजा तर होतेच पण गरबा रास किंवा रास-गरब्याची धूम काही वेगळीच अनुभवायला मिळते. उत्सव साजरा करण्याची पारंपरिक पद्धत मी कुतूहलाने बघत होतो. तर तेथील गरबा हा आपल्याकडील धालोत्सव सदृश किंवा श्रवणात, चतुर्थीत फेर धरून घातलेल्या फुगडीसारखा असतो. पण त्यातही फक्त टाळ्या वाजवत किंवा एका विशिष्ट लयीत हात हलवत देवीची स्तुती गात नाचतात. 

अर्थात ही गाणी गुजराती भाषेत असतात. हा ग्रामीण गरबा एका वाड्यापुरता. असं सगळीकडेच स्त्रिया-मुली काही ठिकाणी मुलंसुद्धा गरबा खेळतात. पण हे सगळं देवीच्या रोजच्या आरतीच्या आधी. आणि सगळीकडे दांडिया प्रचलित आहे, ती खरं तर असते रासलीला. यात राधा कृष्णाची गीतं किंवा गुजराती लोकगीतं गायली जातात. हातात काठ्या म्हणजे दांडिया या तलवार स्वरूप असतात. देवी महिषासुराशी लढली त्या तलवारीचं प्रतीक म्हणून. या रास-गरब्याचं स्वरूप खूप भव्यदिव्य असलेलं आम्ही रात्रभर जागून आणि गुजराथमधल्या वेगवेगळ्या शहरात जाऊन पाहिलं आहे. त्याकाळी फाल्गुनी पाठकला अशा रास-गरब्यात हजारो संख्येने नाचणाऱ्या लोकांसमोर भव्य वाद्यवृंदासह गाताना प्रत्यक्ष पाहिलं आहे.

काही ठिकाणी हे मंडप इतके भव्य असतात की तीन ते चार हजार जोड्या उत्स्फूर्तपणे देहभान विसरून नाचत रास-गरब्याचा आनंद घेत असतात. ही गुजराथी परंपरा असलेल्या रास-गरब्याची मला समजलेली आणि समजून घेतलेली बाजू तिलाही आता चाळीस वर्षे उलटून गेली आहेत. पण मनात अजूनही ठसलेला आहे रास-गरबा. जो थोड्या उशिरा म्हणजे रात्री साडेनऊ दहा वाजता सुरू होऊन उत्तररात्री रंगत जातो. गुर्जर भूमीत याची देही याची डोळा याची मजा पाहिली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 'गरबा घुमतो जाय..' (गरबा उत्तरोत्तर घुमत जातो.) आणि 'रास रमतो जाय' (रास रात्रभर रमत
जाते..)

आज आपल्या गोव्यात तथाकथित दांडिया (खरं तर, गरबा रास किंवा रास-गरबा) जो आता आता भरभराटीला आला असून गुजराथी असूनही इथली परंपरा बनू पाहातोय. त्यापेक्षा गोव्यातील पारंपरिक नवरात्रोत्सव बघायचा असेल तर देवभूमी फोंडा तालुक्यात जाऊन तिथला 'मखरोत्सव' बघावा. हा 'मखरोत्सव' म्हणजे देव-देवतांना सजवलेल्या मखरात बसवून आरतीच्या तालावर झुलवले जातात. तेसुद्धा घंटेच्या तालबद्ध वादनाने. वातावरण अगदी धार्मिक. गडबड गोंधळ नाही की चेंगराचेंगरी नाही. ज्याला जिथून दिसेल तसा आनंद घ्यायचा. अगदी उत्सुकतेने आलेल्या बाहेर गावातील भाविकांसाठी जणू पर्वणीच. त्यात कोणताच बदल मी गेल्या पन्नास वर्षात पाहिला नाही. पण दरवर्षी नजाकतीने सजवलेली मखरे पाहाणे यात एक आनंद असतो, चैतन्य असते.

धार्मिक पर्यटनाच्या नुसत्या गप्पा मारणाऱ्यांनी एकदा हा मखरोत्सव स्वतः अनुभवावा आणि जाहिरात करून पर्यटकांचा ओघ तिकडे वळवावा.
 

Web Title : गरबा-रास: गुजरात से गोवा के डांडिया तक एक सांस्कृतिक यात्रा।

Web Summary : लेखक गुजरात में प्रामाणिक गरबा-रास के अनुभव को याद करते हैं, और गोवा के विकसित डांडिया दृश्य के साथ इसकी तुलना करते हैं। वे गोवा के पारंपरिक 'मखरोत्सव' को पसंद करते हैं।

Web Title : Garba-Raas: A Cultural Journey from Gujarat to Goa's Dandiya.

Web Summary : Author recalls experiencing authentic Garba-Raas in Gujarat, contrasting it with Goa's evolving Dandiya scene. He prefers Goa's traditional 'Makhrotsav'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.