डिजिटल अरेस्ट भासवून ६० लाखांची फसवणूक; तोतयास साताऱ्याहून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 08:24 IST2026-04-12T08:23:49+5:302026-04-12T08:24:53+5:30
या टोळीने डिजिटल अटक आणि मनी लॉड्रिंगच्या नावाखाली तक्रारदाराला भीती घालून पैसे उकळले.

डिजिटल अरेस्ट भासवून ६० लाखांची फसवणूक; तोतयास साताऱ्याहून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील पणजी येथील एका रहिवाशाची ६० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गोवा सायबर गुन्हे पोलिस ठाण्याला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्रातील सातारा येथून अक्षय सुरेश निकम या संशयिताला ताब्यात घेतले आहे. या टोळीने डिजिटलअटक आणि मनी लॉड्रिंगच्या नावाखाली तक्रारदाराला भीती घालून पैसे उकळले.
तक्रारदाराला एका व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता, ज्यामध्ये आरोपींनी संगनमताने सीबीआय मुंबईचे अधिकारी आणि दंडाधिकारी असल्याचे भासवले. तक्रारदार मनी लॉड्रिंग प्रकरणात अडकल्याचे सांगून त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे देखरेखीखाली ठेवल्याचा बनाव रचला. दबाव टाकून ६० लाख रुपये आरटीजीएसद्वारे दोन बँक खात्यांत वळते करण्यास भाग पाडले.
या प्रकरणाचा तांत्रिक तपास केल्यानंतर पोलिसांनी साताऱ्यातून अक्षय सुरेश निकम याला शोधून काढले. पोलिस उपनिरीक्षक अनिल पोलेकर, हवालदार अनय नाईक आणि पोलिस कॉन्स्टेबल विनय आमोणकर यांच्या पथकाने साताऱ्यात जाऊन ही कारवाई केली. आरोपीच्या बँक खात्यात ४६ लाख रुपये जमा झाले होते, अक्षयच्या बैंक खात्याचा संबंध मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकसह गोव्यातील अशा एकूण १२ सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांशी असल्याचे उघड झाले आहे. या टोळीने सुमारे ३ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
संशयिताला पोलिस कोठडी
अटक केलेल्या संशयिताला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मागण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. ही कारवाई अधीक्षक राजू राऊत देसाई आणि अतिरिक्त अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली.