पोलिसाची नोकरी देतो सांगून सहा लाखांची फसवणूक; वास्कोत आईसह मुलास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2024 12:41 IST2024-11-14T12:40:34+5:302024-11-14T12:41:27+5:30
पोलिस दलात शिपाई पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून आई - मुलाने एका महिलेची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

पोलिसाची नोकरी देतो सांगून सहा लाखांची फसवणूक; वास्कोत आईसह मुलास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को:पोलिस दलात शिपाई पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून आई - मुलाने एका महिलेची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी (दि. १३) उघडकीस आला. वास्को पोलिसांनी बुधवारी बायणा येथील उमा पाटील आणि तिचा मुलगा शिवम पाटील (रा. झुआरी कॉम्प्लेक्स बायणा) यांना याप्रकरणी अटक केली.
पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले की, चिंचवाडा चिंबल (रायबंदर) येथील रश्मी चोपडेकर (४६) यांच्या मुलाला गोवा पोलिस दलात नोकरी देण्याचे आमिष संशयित उमा पाटील आणि शिवम पाटील यांनी दाखवले होते. संशयितांनी त्यांच्याकडून ६ लाख रुपये घेतले होते. मुलाला पोलिसांत नोकरी मिळणार या आशेने रश्मी यांनी उमा आणि शिवम पाटील यांना पैसे दिले. मात्र मुलग्यास नोकरी मिळाली नाही आणि दोघा संशयितांनी पैसे परत केले नसल्याने फसवणूक केल्याचे रश्मी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवली. पोलिसांनी भादंसं ४२० आरडब्ल्यू ३४ कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक केली.