Former minister Suresh Amonkar dies due to covid | माजी मंत्री सुरेश आमोणकर यांचे कोविडमुळे निधन

माजी मंत्री सुरेश आमोणकर यांचे कोविडमुळे निधन

पणजी : राज्याचे माजी आरोग्य मंत्री व गोवा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुरेश आमोणकर यांचे सोमवारी रात्री मडगावच्या कोविड इस्पितळात निधन झाले. आमोणकर हे मूत्रपिंड विकाराने त्रस्त होते पण त्यांना कोविडची लागण झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कोविडमुळे मरण पावणा:या रुग्णांची एकूण संख्या मंगळवारी गोव्यात आठ झाली. आमोणकर हे मृत्यूसमयी 58 वर्षे वयाचे होते.


आमोणकर हे पाळी (आताचा साखळी) मतदारसंघाचे आमदार म्हणून 1999 व 2002 अशा दोन निवडणुकांवेळी निवडून आले. आमोणकर अगोदर फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले होते. मग ते पर्रीकर मंत्रिमंडळात मंत्री होते. आरोग्य खाते ते सांभाळत होते. एक मितभाषी, शांत व सौम्य स्वभावाचे डॉक्टर व मंत्री असा त्यांचा गोव्याला परिचय होता. त्यांच्या निधनाचे दु:ख कळताच साखळीतील लोकांनाही खूप दु:ख झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही दु:ख व्यक्त केले. आमोणकर यांचे निधन झाल्याची घोषणा आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी केली.


आमोणकर यांना 2007 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार स्व. गुरुदास गावस यांनी प्रथम पराभूत केले. त्यानंतर गावस यांचे 2008 च्या आसपास निधन झाले व साखळीत विधानसभेची पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत आमोणकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली. स्व. मनोहर र्पीकर यांच्याशी आमोणकर यांचे मतभेद झाले होते. आमोणकर यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी बंड केले व अपक्ष निवडणूक लढवली. त्या पोटनिवडणुकीत भाजपच्या मतांचे विभाजन झाले व प्रमोद सावंत आणि आमोणकर असे दोघेही पराभूत झाले. काँग्रेसतर्फे प्रताप गावस त्यावेळी जिंकले. आमोणकर पुन्हा कधीच विधानसभा निवडणूक जिंकले नाही. 2012 ची निवडणूक प्रमोद सावंत जिंकले. आमोणकर व भाजप यांच्यात आलेली कटुता कायम राहिली. अलिकडे ते राजकारण पूर्णपणो सोडून आपला वैद्यकीय व्यवसायच करत होते. भाजपचे काही माजी नेते तसेच काही माजी मंत्री कायम आमोणकर यांच्याशी संपर्क ठेवून होते.


आमोणकर यांची मूत्रपिंडे निकामी झाली होती. ते डायलसिसवर होते. ते ज्या खासगी इस्पितळात उपचारांसाठी जात होते, त्याच इस्पितळात त्यांना कोविडची लागण झाली असावी असे डॉक्टरांचे म्हणणो आहे. आमोणकर हे मूळचे डिचोली तालुक्यातील आमोणा गावचे. तथापि, ते साखळीतच स्थायिक झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.


कुंकळ्ळीचे आमदारही गंभीर ?
दरम्यान, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस यांनाही यापूर्वीच कोविडची लागण झालेली आहे. डायस हे देखील इस्पितळात उपचार घेत आहेत. डायस यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. डायस यांच्या कुटूंबाच्या दोघा सदस्यांनाही कोविडची लागण झालेली आहे. माजी मंत्री जुङो फिलिप डिसोझा यांचे बंधूचे शनिवारच्या मध्यरात्री निधन झाले. तो कोविडमुळे झालेला सातवा मृत्यू होता. आमोणकर यांच्या रुपात आठव्या मृत्यूची नोंद झाल्याने गोव्याला धक्का बसला आहे.


 आमोणकर यांच्या निधनाने तीव्र दु:ख झाले. ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. तसेच माजी मंत्रीही होते. त्यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही.
- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Web Title: Former minister Suresh Amonkar dies due to covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.