इंडिगो संकटातही गोव्यातील दाबोळी विमानतळावरून सुरळीत उड्डाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:32 IST2025-12-11T14:30:13+5:302025-12-11T14:32:40+5:30
दाबोळी विमानतळाच्या प्रभारी संचालक लक्ष्मी जी. एस. यांनी माहिती दिली.

इंडिगो संकटातही गोव्यातील दाबोळी विमानतळावरून सुरळीत उड्डाणे
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: इंडिगो एअरलाईन्स विमान कंपनीतील कार्यात्मक संकटामुळे दाबोळी विमानतळावर निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने यशस्वी व्यवस्थापन करत प्रवाशांना अखंडित आणि सुरळीत सेवा दिल्या. दाबोळी विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, विमानकंपन्या तसेच गोवा पोलिस आणि वाहतूक पोलिस यांच्यातील समन्वयामुळे सुरक्षा आणि उड्डाण व्यवस्थापन सुरळीत पार पडले, अशी माहिती दाबोळी विमानतळाच्या प्रभारी संचालक लक्ष्मी जी. एस. यांनी दिली.
बुधवार (दि. १०) दाबोळी विमानतळावर आयोजित पत्रकार परिषदेत, इंडिगो एअरलाईन्सच्या कार्यात्मक संकटामुळे दाबोळी विमानतळावर निर्माण झालेली अडचण कशी दूर केली गेली व प्रवाशांना विविध सुविधा कशा प्राप्त करून दिल्या गेल्या याबाबत माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला दाबोळी विमानतळाच्या प्रभारी (ऑफिशिएटिंग) संचालक लक्ष्मी जी. एस., केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे डेप्युटी कमांडंट रोहन पोवार, दाबोळी विमानतळ प्रमुख सुरक्षा अधिकारी विपिन श्रीवास्तव, दाबोळी विमानतळ संचालकाचे ओएसडी भूषण चव्हाण आणि ऑपरेशन्स व्यवस्थापक निखिलेश मल्होत्रा उपस्थित होते.
दाबोळी विमानतळाच्या प्रभारी संचालक लक्ष्मी जी. एस. म्हणाल्या की, चेक-इन, प्री-सेक्युरिटी आणि बोर्डिंग विभागांमध्ये अतिरिक्त कर्मचारी तैनात केले गेले होते. तसेच, इंडिगो एअरलाईन्सच्या कार्यात्मक संकटामुळे विमानतळावर गर्दी टाळण्यासाठी अतिरिक्त तिकीट काऊंटर सुरू करून यशस्वीरित्या गर्दी नियंत्रित करण्यात आली. डिजिटल असिस्टन्स आणि स्विंग ऑपरेशन्सच्या मदतीने प्रवाशांच्या हालचाली देखील सुलभ करण्यात आल्या.
आवश्यक सुविधा उपलब्धतेवर भर
दाबोळी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीतील सर्व सुविधा -आसनव्यवस्था, लहान मुलांसाठी 'बेबी केअर रूम', व्हीलचेअर सेवा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत्या. सर्व स्वच्छतागृह आणि टर्मिनल क्षेत्रे स्वच्छ ठेवली गेली आणि आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व विशेष गरज असलेल्या प्रवाशांसाठी प्राधान्य सेवा तसेच प्रथमोपचार सुविधा, खाण्यापिण्याची व प्रवाशांसाठी वाचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
माहितीसाठी विविध सुविधा
विमान उड्डाणांच्या विलंब आणि रद्द होण्याबाबतची माहिती एफआयडीएस डिस्प्ले, सोशल मीडिया आणि विमानकंपनी समन्वयाद्वारे तत्काळ देण्यात येत होती. प्रवाशांच्या 'लगेज' (सामान) वितरणाचे कामही व्यवस्थित चालू होते आणि काही किरकोळ विलंब त्वरितच त्या दिवशी दूर करण्यात आले. तसेच मदत केंद्रांद्वारे प्रवाशांच्या तक्रारी आणि शंका तत्काळ दूर केल्या जात होत्या, अशी माहिती देखील देण्यात आली.
उड्डाणे वेळेतच
९ डिसेंबर रोजी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केलेल्या तपासणीत दाबोळी विमानतळाच्या सक्रिय व्यवस्थापनाचे आणि विविध यंत्रणांतील समन्वयाचे कौतुक केले. दाबोळी विमानतळाची कार्यप्रणाली आता पुन्हा पूर्णपणे सुरळीत झाली असून, सात नियोजित उड्डाण रद्दीकरणांच्या पार्श्वभूमीवरही प्रवाशांची कोणतीही गर्दी होत नाही. तिकीटबाबत अथवा विमान रद्द होण्यावर प्रवाशांना सतत मदत उपलब्ध करून दिली जात आहे, अशी माहिती लक्ष्मी जी. एस. यांनी दिली.
बुधवारपर्यंत तब्बल ८७ विमाने रद्द
दाबोळी विमानतळावरून ३ डिसेंबरपासून इंडिगो एअरलाईन्सची विमाने रद्द होण्यास सुरुवात झाली असून, बुधवार (दि. १०) पर्यंत एकूण ८७ विमाने रद्द झाल्याची माहिती संचालक लक्ष्मी जी. एस. यांनी दिली. ५ डिसेंबरला दाबोळी विमानतळावर सर्वाधिक ३४ इंडिगो एअरलाईन्सची विमाने रद्द झाली. या काळात दाबोळी विमानतळावर आलेल्या प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून दाबोळी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह विमानतळाशी संबंधित सर्व भागधारकांनी (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, विमानकंपनी, गोवा पोलिस, वाहतूक पोलीस इत्यादी) उत्कृष्ट कार्य केले असल्याचे लक्ष्मी यांनी सांगितले.